मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ हवेसाठी राबवल्या जाणाऱ्या सालभर ६० या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकर स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या ६० मायक्रोग्रॅम्स पर क्युबिक मीटर या सुरक्षित पातळीनुसार शहरात हवेची पातळी राखली जावी यासाठी योग्य उपाययोजना राबवल्या जाण्याची खातरजमा सरकारने करावी, अशी मागणी या मोहिमेतून करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतील वायुप्रदूषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी या स्वच्छ हवेच्या अभियानाला बळकटी देण्यासाठी सेलिब्रिटीज, कार्यकर्त्यांसोबतच सामान्य नागरिकांनी स्वच्छ हवेची, पर्यावरण संवर्धन अशा मागण्या करणारे फलक हातात धरलेले फोटो ट्विटरवर शेअर केले. अनेकांनी तर आपल्या मातृभाषेतही संदेश लिहून इंग्रजीसोबतच असामी, तेलुगू, मराठी, हिंदी या भाषांमध्येही संदेशांची लाट आणली. मात्र, दुर्दैव असे की या महासंकटामुळे हा बदल झाल्याने नागरिकांना मुक्तपणे श्वास घेण्यासाठी बाहेरही पडता आले नाही. हेच लक्षात घेऊन अवघ्या १२ वर्षांच्या पर्यावरण कार्यकर्त्या रिधिमा पांडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी डिजिटल मोहीम सुरू केली.वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशभट यांनी सांगितले, आता सगळे व्यवहार पूर्ववत झाले की स्वच्छ हवेसाठी आपण आपल्या गाड्या सोडून देऊ, कारखाने बंद करू हे अशक्य आहे. मात्र, कठोर धोरणे आणि नियम त्यांची ठोस अंमलबजावणी यामुळे चांगली आणि आरोग्यदायी हवा मिळवता येईल. सरथ गुट्टीकुंडा म्हणाले, आपल्याला वायुप्रदूषणाचे स्रोत ठाऊक आहेत आणि आता आपण हे स्रोत स्वच्छ राहावेत यासाठी अधिक काही करण्याची गरज आहे. हे लक्ष्य गाठणे आपल्याला शक्य आहे. हे कठीण असले तरी शक्य आहे. दळणवळण, उद्योग, कचरा, स्वयंपाक, हिटिंग, लायटिंग आणि रस्ते अशा सर्व स्रोतांना स्वच्छ ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली म्हणाल्या, मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे शहराची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत फक्त स्वच्छ हवा आणि कमी झालेल्या आवाजाने काहीसा दिलासा दिला. याबाबत एका बळकट जनमोहिमेची आपल्याला गरज आहे. स्वच्छ आणि हरित दळणवळणाला प्राधान्य देत उत्सर्जन कमी करण्याबाबत आपण प्राधान्यक्रम ठरवण्याची एकत्रित मागणी मुंबईसाठी करायला हवी.