हॉटेल व्यावसायिकांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोरोनाची भीती अजूनही डोक्यावर असतानाच गेल्या आठ महिन्यांच्या लॉकडाऊनचा तणाव घालविण्यासाठी पर्यटकांनी शनिवारपासून आजच्या तिसऱ्या दिवशी रायगडात विक्रमी गर्दी केली आहे. अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन या तालुक्यांतील किनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले आहेत. पर्यटकांच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर लॉकडाऊनमुळे ओस पडलेले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेल्याने हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
अलिबाग तालुक्यातील मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, नागाव, मुरूडमधील काशीद, मुरूड, पुढे दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटनाच्या मूलभूत सुविधांमध्ये प्रसिद्ध असणारे दिवेआगर येथे येण्याची पर्यटकांना उत्सुकता असते.
कोरोना व लॉकडाऊनच्या काळात पर्यटन संकटात आले होते. त्यामुळेच कोकणातल्या पर्यटन उद्योगाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली स्थिती, यामुळे कोकणातल्या पर्यटन उद्योगाची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. मात्र, दिवाळीनंतर गर्दी वाढताना दिसत आहे. त्यामुळे बऱ्याच महिन्यांनंतर हॉटेल व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
कोरोना संकट असल्याने पर्यटकांची संख्या या वेळी कमी झाली आहे. काही मोजक्याच लॉज, रिसॉर्टला दिवाळीत पूर्ण बुकिंग असले तरी अनेक ठिकाणी पर्यटकांच्या बुकिंगसाठी घासाघीस करावी लागत आहे. रूमचे दर ऐकून पुन्हा पर्यटक फोन करीत नाहीत. त्यामुळे रिसॉर्ट, लॉजिंगचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्नही व्यावसायिकांना पडला आहे.
ऐतिहासिक स्थळांवरही पर्यटकांची गर्दी
रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्या छोट्या व्यावसायिकांनाही दिवाळीत फटका बसला आहे. शासनाने समुद्रकिनारी पर्यटन सुरू केले असले तरी ऐतिहासिक गड, किल्ले, वास्तू यांच्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी होती. त्यामुळे शिवप्रेमी, ट्रेकिंग, सामाजिक संस्थांनी गड, किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, नुकतीच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गड, किल्ले ऐतिहासिक वास्तू हे कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांना खुले केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागू झाल्यामुळे या ठिकाणच्या पर्यटन व्यवसायाला आता चालना मिळणार आहे.