लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 07:39 PM2024-06-16T19:39:59+5:302024-06-16T19:40:43+5:30

CM Eknath Shinde News: ठाकरे गटापेक्षा आपला स्ट्राइक रेट चांगला असून, आता जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

after lok sabha election 2024 success now prepare for the legislative assembly election cm eknath shinde instructions to shiv sainik | लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश

लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश

CM Eknath Shinde News: १९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकतीने विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र या निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. १९ जून या वर्धापनदिनापासून पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा सुरू करणे, आपापल्या विभागात मतदारांची नोंदणी करून मतदारयाद्या दुरुस्त करणे, तसेच विभागवार शिवदूतांच्या नेमणुका करणे याला प्राधान्य देण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

ठाकरे गटापेक्षा स्ट्राइक रेट उत्तम

या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राइक रेट हा ठाकरे गटापेक्षा उत्तम होता. त्यांनी २२ जागा लढवून ९ जिंकल्या. आपण १५ जागा लढवून ७ जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट हा ४२ टक्के तर आपला ४८ टक्के एवढा आहे. दुसरीकडे मुंबईत त्यांच्यापेक्षा २ लाख जास्त मते आपल्याला मिळालेली आहेत. बाळासाहेबांचे छत्रपती संभाजीनगर आपण राखले असून कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिलेली आहे. त्यामुळे जनता आपल्याला साथ देत आहे. असे असले तरी महायुतीबद्दल या निवडणुकीत निर्माण झालेले चुकीचे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

खोटे नेरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी 'संविधान बदलणार' असे खोटे नेरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे चित्र फार काळ टिकणार नाही. कारण केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील आपले सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे आशा चुकीच्या नेरेटिव्हची आगामी विधानसभा निवडणुकीत  पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही असा निर्धार व्यक्त करून कामाला लागण्याच्या सूचना शिंदे यांनी केली. तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीसहित, दहीहंडी, गणपती, दसरा, दिवाळी असे सर्व हिंदूंचे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत असेही सांगितले. वारीला निघणाऱ्या पालख्यांचे पक्षाच्या वतीने जागोजागी स्वागत करावे तसेच त्यांची सोय करावी असेही आदेश दिले. तसेच गावागावात वाडी वस्तीवर शिवसेनेचे बोर्ड लागावेत, शाखा सुरू कराव्यात असेही सांगितले. 

शिवसेना राबवणार वृक्षरोपणाची मोहीम

यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील तापमान प्रचंड वाढले होते. राज्यातील काही भागातील तापमान ५० ते ५२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शासनाकडून वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात १ लाख वृक्ष लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र त्यासोबत अशीच मोहीम पक्षाच्या वतीने राबवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढाकार घेऊन कामाला लागावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. या मोहिमेअंतर्गत पक्षाच्या वतीने रोपे देण्यात येणार असून पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. वाढते प्रदूषण आणि तापमानवाढ आटोक्यात आणण्यासाठी सामजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक शिवसैनिकाने या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत केले.
 

Web Title: after lok sabha election 2024 success now prepare for the legislative assembly election cm eknath shinde instructions to shiv sainik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.