मुंबई : वर्षानुवर्षे भाजपासोबत असलेल्या शिवसेनेने मंगळवारी विधानसभा अधिवेशनाच्या दुस:या दिवशी भाजपाला बॅकफूटवर नेले. विधानसभा सदस्यांचा शपथविधी पूर्ण व्हायचा असताना अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत कशी काय संपविली जात आहे, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित करीत शिवसेनेने सत्तापक्ष भाजपाची कोंडी केली. शेवटी ही मुदत वाढविण्याचा निर्णय हंगामी अध्यक्ष जिवा पांडू गावित यांनी दिला आणि वादावर पडदा पडला.
दीर्घ कालावधीनंतर शिवसेना मंगळवारी सभागृहात आक्रमक झालेली दिसली. अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी 12 र्पयत होती. मात्र अनेक सदस्यांनी अजून शपथच घ्यायची असल्याने ते या अर्जावर सूचक वा अनुमोदक म्हणून सही करू शकणार नाहीत. त्यामुळे ही मुदत वाढवा, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी केली. लगेच आक्रमक सेना सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणा देऊ लागले.
ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी शपथविधी सुरू असताना अर्ज भरण्याची मुदत आधीच संपविणो योग्य होणार नाही, असे मत व्यक्त केले मात्र शपथविधी थांबविण्यास विरोध दर्शविला. राष्ट्रवादीचे गटनेते आर. आर. पाटील यांनीही मुदत वाढविण्याची मागणी केली.
गदारोळात कामकाज स्थगित करावे लागते की काय, असे चित्र असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांचा शपथविधी सुरू असताना यापूर्वी कधीही कामकाज स्थगित झालेले नाही. शिवसेनेला नवा पायंडा पाडायचा आहे का, असा प्रश्न केला. शपथविधी थांबणो योग्य होणार नाही. अर्ज भरण्याची मुदत वाढविता येऊ शकते, असा मार्ग त्यांनी सुचविला. अध्यक्षांनी तो मान्य करीत अर्ज भरण्याची वेळ वाढविली.