मुंबई : दोन वर्षांचा असतानाच वडिलांचे छत्र हरपले, स्कूल बसमध्ये वाहक म्हणून काम करणाऱ्या आईनेच आजवर कुटुंबाचा गाडा हाकला. पण, लाॅकडाऊनच्या काळात आईचीही नोकरी गेली. तसेही शाळा बंद आणि ऑनलाइन वर्गात नीट शिकवणी होत नाही. त्यामुळे वेळ वाया घालविण्यापेक्षा पैसे कमवून आईला मदत करण्याच्या इराद्याने सुभान शेख या चौदा वर्षीय विद्यार्थ्याने थेट चहा विकण्याचे काम सुरू केले. कोरोनाच्या काळात जगण्यासाठी धडपडणारी, मिळेल ते काम करीत संघर्ष करणारी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेत. यातीलच एक सुभान शेख, भायखळा परिसरातील लहानगा चहावाला. भायखळ्यातील झोपडपट्टीत चौदा वर्षीय सुभान शेख राहतो. आई आणि दोन बहिणींसोबत राहणारा सुभान इथल्याच अंजुमन इस्लाम या शाळेतला विद्यार्थी. लाॅकडाऊनच्या पाच महिन्यांपासून मात्र भेंडीबाजारच्या गल्ल्यांमध्ये, पेठांमधील दुकानांत चहा विक्रीचे काम करतो. सुरुवातीला घरीच बनविलेला चहा थर्मासमधून विकण्याचा सपाटा सुभानने लावला. शाळा सोडून चहा का विकतो? विचारल्यावर सुभान म्हणतो, “लाॅकडाऊनच्या काळात आईचे काम गेले. घरी पैशाची चणचण सुरू झाली. तसेपण शाळा बंदच होत्या. नंतर ऑनलाइन क्लास सुरू झाले, पण तिथे स्क्रीनवरची गर्दी. त्यात शिकणे होतच नाही. मग, वेळ घालविण्यापेक्षा चहा विकायला सुरुवात केली. आता, अनलाॅक सुरू झाले आहे. त्यामुळे जवळच्या छोट्या हाॅटेलातून चहा बनवून आणतो. स्टोव्ह आणि गॅसचे पैसे न घेता मला ते चहा बनवायला देतात. त्यातून आता दिवसाला तीनशे ते चारशे रुपयांची कमाई होते. दुपारी १ वाजता काम सुरू करतो आणि रात्री उशिरापर्यंत चहा विकतो. मी आणि माझ्या दोन बहिणी आईवरच अवलंबून आहोत. बहिणी उर्दू शाळेत जातात. त्यांना फीमध्ये सवलत आहे. माझी उर्दू चांगली नाही, असे सुभान प्रांजळपणे कबूल करतो.दरम्यान, सुभानच्या चहा विक्रीची कहाणी कळताच माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी सुभान आणि त्याच्या आईशी चर्चा केली. शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले. चौदा वर्षीय सुभानचे सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित असायला हवे, असे सांगत देवरा यांनी सोशल मीडियातून सुभानला मदत करण्याचे आवाहनही केले.
आईची नोकरी गेल्याने विकावा लागतोय चहा, पुस्तकांऐवजी लहानग्याच्या हातात आली चहाची किटली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 2:15 AM