लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आम्ही मराठा आहोत, कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना ठणकवणाऱ्या रामदास कदम यांनी आझाद मैदानातील आपल्या भाषणातून घूमजाव केले. कोकणातील परिस्थिती वेगळी असल्यामुळे आपण ही भूमिका घेतल्याचे कदम यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले.
जरांगे आम्ही तुमच्या विरोधात नाही. मराठा आरक्षण मिळावे, ही आमचीही भूमिका आहे. सरकारच्या छाताडावर बसा. तज्ज्ञांचे मत घ्या; पण मराठ्यांना टिकावू आरक्षण मिळवून द्या. कारण ओबीसीमधून आरक्षण घेतल्यास ते बांधव विरोध करतील. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता कदम यांनी व्यक्त केली.
ज्योती वाघमारे यांना भाषणाची संधी
- शिवसेनेच्या सोलापूरमधील पदाधिकारी ज्योती वाघमारे यांना दसरा मेळाव्यात भाषणाची संधी देण्यात आली. - मेळाव्याची सुरुवात त्यांच्या भाषणाने झाली. त्यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. - मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात वायफळ बडबड करणारे राऊत यांना वेड्याच्या रुग्णालयात न्यावे. - तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि हिंदूंच्या दैवतावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे या तुमच्या शिवसेनेच्या चेहरा आहेत का, असा सवाल त्यांनी ठाकरे गटाला विचारला.