लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हिरेनची हत्या केल्यानंतर चार आरोपी ठाण्यातील एका ढाब्यावर गेले. काहीही गैरकृत्य न केल्याचे भासवीत त्यांनी तेथे यथेच्छ जेवण करून पसार झाले होते.
आनंद जाधव, संतोष शेलार, मनीष सोनी आणि सतीश मोतकुरी ऊर्फ टन्नी यानी ही कामगिरी पार पाडली. त्यांनी प्रदीप शर्माला फोन करून कृत्याची माहिती दिली होती, असे एनआयएने आरोपपत्रात नमूद केले आहे.
आनंद जाधवने एनआयएला दिलेल्या जबाबात सांगितले आहे की, त्याने अन्य तिघांच्या मदतीने चार मार्चला मनसुख हिरेनची हत्या केली. त्या आधी एक दिवस त्या ठिकाणची रेकी करण्यात आली होती. चार मार्चला मनीष सोनीच्या लाल रंगाच्या तवेरातून ते घोडबंदर रोडवरून ठाण्याला गेले. मनसुख हिरेन हे लाल तवेरामध्ये मधल्या सीटवर बसले. थोड्या वेळाने सतीश मोतकुरी याने मनसुखचे तोंड दाबले आणि तोंडात रुमाल कोंबला. इतरांनी त्याचे नाक दाबले जेणेकरून त्याला श्वास घेता येणार नाही. दहा ते पंधरा मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला असे लक्षात आल्यानंतर ते गाडीने खाडीच्या दिशेने रवाना झाले.
हत्या झाल्यानंतर त्यांनी प्रदीप शर्मा यांना फोन करून सांगितल्यावर त्याने तिकडून ओके असे उत्तर दिले होते. त्यानंतर सर्वजण ठाण्यातील काठियावाडी ढाब्यावर गेले आणि पोटभरून जेवण केले होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या दिशेने निघून गेले, असे त्याने जबाबात नमूद केले आहे.