सिडकोच्या शिल्लक घरांची मार्चनंतर सोडत
By admin | Published: February 18, 2015 12:47 AM2015-02-18T00:47:28+5:302015-02-18T00:47:28+5:30
सिडकोने विविध विभागात बांधलेल्या गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या घरांसाठी मार्चनंतर सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
नवी मुंबई : सिडकोने विविध विभागात बांधलेल्या गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या घरांसाठी मार्चनंतर सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. खारघर येथील वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उलवे येथील उन्नती प्रकल्पात जवळपास २७२ सदनिका शिल्लक आहेत. विविध संवर्गातील आरक्षणानुसारच या सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
सिडकोने २00८ मध्ये खारघर सेक्टर १६ आणि १७ मध्ये वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृहप्रकल्पातील २१४४ घरांची सोडत काढली होती. विविध आर्थिक घटकांना समोर ठेवून हा गृहप्रकल्प साकारण्यात आला होता. यात केएच-१, केएच-२, केएच-३ आणि केएच-४ टाईपच्या घरांचा समावेश होता. यातील विविध टाईपच्या १९३ सदनिका विक्री न झाल्याने पडून आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या या सदनिका सोडत काढून पुन्हा विकण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्याचप्रमाणे उन्नती प्रकल्पातील ७९ घरेही विक्रीसाठी काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या शिल्लक घरांच्या किमती सध्याच्या दरानुसार असणार आहेत. विशेष म्हणजे सिडकोने उभारलेल्या विविध गृहप्रकल्पातील शिल्लक घरांची सोडत काढण्यासाठी संचालक मंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मात्र विविध कारणांमुळे ही सोडत रखडली होती. असे असले तरी आता मार्चनंतर ही सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली. (प्रतिनिधी)