फडणवीस-ठाकरेंच्या भेटीनंतर रिफायनरीचा करार लांबणीवर, रत्नागिरीतील प्रकल्पाला ग्रामस्थांचा होता विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:11 AM2018-02-16T06:11:53+5:302018-02-16T06:12:14+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तीव्र विरोधानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होणा-या रिफायनरी प्रकल्पाचा सामंजस्य करार लांबणीवर टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १८ फेब्रुवारीपासून होणाºया मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत हा करार होणार होता.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तीव्र विरोधानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होणा-या रिफायनरी प्रकल्पाचा सामंजस्य करार लांबणीवर टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १८ फेब्रुवारीपासून होणाºया मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत हा करार होणार होता.
या प्रकल्पाला शिवसेनेचा सुरुवातीपासून तीव्र विरोध आहे. नाणारच्या रिफायनरीबाबत मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये करार होणार असल्याचे समजताच ठाकरे यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. विनायक राऊत, राज्यमंत्री रवींद्र वायकर, आ. वैभव नाईक, राजन साळवी आणि नाणारच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सायंकाळी भेट घेतली. या प्रकल्पाला ७५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थांचा विरोध असल्याबाबतचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
या भेटीनंतर उद्योगमंत्री देसाई यांनी पत्रकारांना सांगितले की, मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये या प्रकल्पाबाबतचा करार होणार नाही. प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
तथापि, मुख्यमंत्री फडणवीस हे या प्रकल्पावर ठाम असून स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी ठाकरे यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
रिलायन्सच्या एका रिफायनरीने संपूर्ण गुजरातचे अर्थकारण बदलले. रिफायनरीमुळे पर्यावरणाचे नुकसान होईल हे चुकीचे आहे. चेंबूरच्या रिफायनरीने कोणतेही नुकसान झालेले नाही. आता तर तंत्रज्ञान फार पुढे गेले आहे. रिफायनरी ही गुजरातेत की महाराष्ट्रात असा विषय आला तेव्हा आम्ही महाराष्ट्राचा आग्रह धरला आणि रिफायनरी ही समुद्रातच होऊ
शकते, असे मुख्यमंत्र्यांनी आजच्या भेटीत स्पष्ट केले.
इंडियन आॅइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन भारतीय तेल कंपन्यांनी स्थापन केलेली वेस्टर्न रिफायनरीज् अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कंपनी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात नाणारच्या रिफायनरीबाबत मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत करार होणार होता.
बंदद्वार बैठकीत चर्चा
- मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्येच या वेळी
१५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. लोकसभा, विधानसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेल, अशी भूमिका ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केली आहे. तरीही या दोन पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होत असल्याच्या बातम्याही येत आहेत.
या पार्श्वभूमीवर, दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात शिवसेना सरकारला सहकार्य करेल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे.