शहा-उद्धव यांच्या भेटीनंतर युतीतील तणाव निवळला!
By यदू जोशी | Published: June 7, 2018 05:37 AM2018-06-07T05:37:24+5:302018-06-07T13:57:05+5:30
शिवसेनेच्या भूमिकेवर तीव्र नापसंती व्यक्त केली, पण शेवटी तणाव निवळला आणि युती तुटू न देता लोकसभा, विधानसभा निवडणुका सोबत लढण्यासाठी आणखी चर्चा करण्यावर दोघांमध्ये सहमती झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मातोश्रीवरील भेटीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेतृत्वाला खडे बोल सुनावले. शहा यांनीही शिवसेनेच्या भूमिकेवर तीव्र नापसंती व्यक्त केली, पण शेवटी तणाव निवळला आणि युती तुटू न देता लोकसभा, विधानसभा निवडणुका सोबत लढण्यासाठी आणखी चर्चा करण्यावर दोघांमध्ये सहमती झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दोघांच्याही बोलण्याचा सूर आक्रमक होता, पण नंतर अनेक वर्षांपासूनची युती कायम ठेवण्याच्या दृष्टीने शक्यता तपासण्यावर एकमत झाल्याचे समजते. उभयतांमध्ये दोन तासांपेक्षा अधिक वेळ बंद दाराआड चर्चा झाली.
शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही गेले होते. उभयतांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही वेळ शहा व उद्धव यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले गेले असले तरी ते तुटू न देण्याची भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. आम्ही युती तोडत असल्याचे चित्र भाजपाकडून निर्माण केले जात आहे पण वस्तूत: तुम्हीच वारंवार आम्हाला कमी लेखून कसे दुखावत आहात याचा पाढाच उद्धव यांनी या भेटीत वाचला.
भाजपा नेतृत्वावर शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जाते. केंद्र व राज्य सरकारमध्ये असूनही सरकारच्या निर्णयावर शिवसेना सडकून टीका करते, विधानसभेच्या दोन पोटनिवडणुकात भाजपाने पाठिंबा दिलेला असताना पालघरच्या पोटनिवडणुकीत मात्र शिवसेनेने भाजपाच्या माणसाला उमेदवारी दिली. हे मित्रपक्ष असल्याचे लक्षण नाही या शब्दात अमित शहा यांनी उद्धव यांना भाजपाच्या तीव्र नाराजीची स्पष्ट जाणीव करून दिली.
रतन टाटा, माधुरीची भेट
संपर्क अभियानांतर्गत अमित शहा यांनी बुधवारी प्रख्यात उद्योगपती रतन टाटा व सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांचे पती डॉ.श्रीराम नेने उपस्थित होते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी, भाजपाची वाटचाल आणि उद्दिष्ट या विषयी त्यांनी माहिती दिली. मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिकाही त्यांनी भेट दिली. रतन टाटा यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या औद्योगिक प्रगतीबाबत यावेळी समाधान व्यक्त केले.
शहा यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन सांत्वन केले. शेलार यांच्या आईचे अलिकडेच निधन झाले होते. शहा यांनी श्री सिद्धी विनायक मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. या सर्व ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि भाजपाचे सरचिटणीस अनिल जैन त्यांच्यासोबत होते. अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे आणि भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांची बैठक घेतली. रंगशारदामध्ये तासभर ही बैठक चालली. उद्धव ठाकरेंशी भेटीत घ्यावयाच्या भूमिकेबाबत त्या ठिकाणी चर्चा झाली.
प्रकृती अस्वास्थामुळे लतादीदींची भेट नाही
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चांगली नसल्याने अमित शहा त्यांच्या भेटीला जाऊ शकले नाहीत. ‘माझी आणि अमित शहांची भेट होणार होती पण मला ‘फूड पॉयझनिंग’ झाल्याने मी भेटण्यास असमर्थ असल्याचे त्यांना फोनवरून कळविले. पुढील वेळी ते जेव्हाही मुंबईत येतील मी त्यांना नक्की भेटेन’असे टिष्ट्वट लता मंगेशकर यांनी केले.
युती टिकवण्याची जबाबदारी केवळ आमची नाही : उद्धव
भाजपाकडून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शिवसेनेची होत असलेली उपेक्षा, मोदी सरकारमध्ये मिळालेले एकमेव मंत्रीपद, भाजपाकडून शिवसेनेची पद्धतशीरपणे होत असलेली गळचेपी या बाबत उद्धव यांनी अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली. युती टिकवण्याची जबाबदारी केवळ आमची नाही. सत्तेच्या जोरावर सहकारी पक्षांची गरज नसल्याच्या अविर्भावात भाजपा वागत असल्याने सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत, असेही उद्धव यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र प्रदीर्घ चर्चेनंतर दोघांमधील हा तणाव निवळला असल्याचे स्पष्ट झाले़
राज यांचे कार्टून अन् भाजपाचे लगेच प्रत्युत्तर
अमित शहा हे देशातील कोणकोणत्या नामवंतांना भेटत आहेत याची यादी (बकेट लिस्ट) ते स्वत: वाचत असल्याचे आणि त्या यादीच्या पलिकडे त्यांच्या भेटीसाठी आसुसलेला एक साधा भाजपा कार्यकर्ता उभा असल्याचे कार्टून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच काढले आणि सोशल मीडियावर ते व्हायरलही झाले. थोड्याच वेळात भाजपाने तेच कार्टून बदल करून सोशल मीडियात टाकले. त्यात अमित शहांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची बकेट लिस्ट या शीर्षकाखाली शहा हे भाजपाने जिंकलेल्या राज्यांची यादी वाचत आहेत आणि पलिकडे राज ठाकरे हे ‘ तुम्ही तर एवढी राज्ये जिंकली. माझ्याकडे मात्र जे होते ते पण पळून गेले’, असे म्हणत असल्याचे दाखविले. राज यांना त्यात ‘बारामतीचा नवीन पोपट’असे म्हटले आहे.