शरद पवारांची भेट घेऊन कराळे मास्तर लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:03 PM2024-03-20T15:03:26+5:302024-03-20T15:06:12+5:30
खदखद... स्टाईल फेमस कराळे मास्तर यांनी अनेकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यमान शिंदे सरकारवर आणि केंद्रातील मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई/पुणे - आपल्या हटके विदर्भीय स्टाईलने शिकवण्याच्या पद्धतीमुळे फेमस झालेले खासगी क्लासेसचे कराळे मास्तर आता निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये आपण भाजपाच्या विरोधात आवाज उठवणार असून महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळेल, असा विश्वासही कराळे मास्तर यांनी व्यक्त केला आहे. स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या माध्यमातून कराळे मास्तर विदर्भातील वर्धा येथे ट्यूशन घेतात. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन क्लासेस सुरू असल्याने या कालावधीत त्यांची शिकवण्याची हटके स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तेव्हापासून कराळे मास्तर चर्चेतला चेहरा राहिले आहेत.
खदखद... स्टाईल फेमस कराळे मास्तर यांनी अनेकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यमान शिंदे सरकारवर आणि केंद्रातील मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकरी व तरुण वर्गांच्या समस्यांही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी कराळे मास्तर मातोश्रीवर आले होते. मात्र, मातोश्रीवर त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे, उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने मास्तरांनी नाराजी व्यक्त केली होती. आता, ऐन लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर कराळे मास्तर निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यात जाऊन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, असा विश्वास ही व्यक्त केला आहे.
शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद राहिला तर ही सीट निश्चित मलाच मिळेल, असा विश्वास कराळे मास्तरांनी व्यक्त केला आहे. वर्धा मतदारसंघातून माझी संपूर्ण तयारी सुरू आहे. मतदारसंघातील गावातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांचे मला फोन येत आहेत. माझ्याबद्दल वर्धा मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. शेतकऱ्याचा मुलगा, शेतकरी, बेरोजगार आणि कष्टकऱ्यांचा आवाज वर्धा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीला उभा राहणार आहे, हा चांगला संदेश समाजात जाईल. वर्ध्यातील स्थानिक नेत्यांचाही मला पाठिंबा असून त्यांचेही मी आभार मानतो, असे कराळे मास्तरांनी म्हटले.
फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पेरणारा मी माणूस असून या देशातील लोकांमध्ये तिरंगा पेरणारा मी माणूस आहे, देशातील लोकांना संविधान समजावून सांगणारा मी माणूस आहे, असेही शरद पवार यांना सांगितले. त्यामुळे, मला शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद राहिल्यास नक्कीच या जागेवर मला उमेदवारी मिळेल, असेही कराळे मास्तरांनी म्हटले. मला संध्याकाळपर्यंत उमेदवारीबाबत सांगितलं जाईल. त्यानंतरही मी भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध काम करणार आहे. मात्र, माझ्या स्तरावर मी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे, असेही कराळे मास्तरांनी पुण्यात माध्यमांसोबत बोलताना सांगितले.