स्वप्नातील संदेशानंतर जैन धर्मगुरूंनी संपवले आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:06 AM2021-05-21T04:06:12+5:302021-05-21T04:06:12+5:30

घाटकाेपरमधील घटना; सुसाइड नोटमधून उघडकीस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘तुमचे आता पृथ्वीवरचे सर्वसामान्यांसाठीचे काम संपलेले आहे, तुम्ही ...

After the message in the dream, the Jain guru ended his life | स्वप्नातील संदेशानंतर जैन धर्मगुरूंनी संपवले आयुष्य

स्वप्नातील संदेशानंतर जैन धर्मगुरूंनी संपवले आयुष्य

Next

घाटकाेपरमधील घटना; सुसाइड नोटमधून उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘तुमचे आता पृथ्वीवरचे सर्वसामान्यांसाठीचे काम संपलेले आहे, तुम्ही परत या’, असे गुरूने स्वप्नात येऊन सांगितल्यामुळे घाटकोपरमध्ये ७१ वर्षीय जैन धर्मगुरूंनी जैन मंदिरातच गळफास घेत आयुष्य संपविल्याची घटना गुरुवारी घडली. मनोहरलाल मुनी महाराज असे त्यांचे नाव असून, त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमधून वरील बाब उघड झाली. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पंतनगर येथील लव गार्डन परिसरातील जैन मंदिरात ते राहण्यास होते. गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास ते नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाइड नोट जप्त केली आहे. त्यात, ‘गुरूने स्वप्नात येऊन सांगितले की, तुमचे आता पृथ्वीवरचे सर्वसामान्यांसाठीचे काम संपलेले आहे, तुम्ही परत या आपण पूजा करूया,’ असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असून, यात संशयास्पद काहीही नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

............................

Web Title: After the message in the dream, the Jain guru ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.