मुंबई : वडाळा पूर्वेकडील श्रीमती मीनाताई कुरूडे मुलींचे रात्र कनिष्ठमहाविद्यालयात (कला/वाणिज्य) शिकणाऱ्या ९५ विद्यार्थिनींची महाविद्यालय प्रशासनाने फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर गुरूवारी मोर्चा काढला. त्याची दखल घेतउपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी विद्यार्थिनींचे नुकसान होऊ देणार नसल्याची हमी दिल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.याबाबत नांदगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळ््यात मेल्विन फाऊंडेशन (पुरस्कृत) महिला कल्याण शिक्षण संस्थेमार्फत मान्यता नसतानाही कनिष्ठ महाविद्यालय चालवले जात होते.
त्यात अकरावीच्या दोन वर्गात ६५ आणि बारावीच्या एका वर्गात ३० विद्यार्थिनींना प्रवेश देऊन महाविद्यालयाने फसवणूक केली. मात्र एका वर्षानंतर हा प्रकार विद्यार्थिनींच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी मनसेकडे धाव घेतली. या प्रकरणात विद्यार्थिनींची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत होते. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक वर्ष वाया जाता कामा नये, अशी भूमिका मनसेने घेतली होती.मनसेच्या शिष्टमंडळाने चव्हाण यांची भेट घेतली. त्यात अकरावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिंनींना जवळच्या महाविद्यालयांत बारावी इयत्तेसाठी प्रवेश मिळवून दिला जाईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. शिवाय बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना तेरावी प्रवेशासाठी दाखल्याऐवजी कार्यालयाकडून एक पत्र उपलब्ध करून दिले जाईल. जेणेकरून त्यांना प्रवेशमिळवताना अडचण येणार नाही. याबदल्यात केवळ विद्यार्थिनींना १०० रुपयांच्या शपथपत्रावर लेखी देण्याची मागणी केली आहे.