'राजकारणात वाद असावेत द्वेष नाही'; जितेंद्र आव्हाडांनी केलं राज ठाकरेंसाठी ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 12:17 PM2022-06-25T12:17:53+5:302022-06-25T12:18:31+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हिप बोनवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून त्यांना आज रुग्णालायातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.
'आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रीया व्यवस्थितरित्या पार पडली! काही वेळापूर्वीच रूग्णालयातून बाहेर पडून घरी पोहोचलो आहे! आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असो! आपला नम्र- राज ठाकरे', असा मोजक्या शब्दांचा संदेश लिहीत त्यांनी शस्त्रक्रियेनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 25, 2022
राज ठाकरेंच्या या ट्विटनंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्यासाठी एक ट्विट केलं आहे. राज ठाकरेजी आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतलात. आपण लवकरच पूर्ण पणे बरे व्हाल ही आई भवानीकडे प्रार्थना...आपण मी कोरोनामध्ये असताना माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती, हे मी विसरलेलो नाही. राजकारणात वाद असावेत द्वेष नाही, असं म्हणत 'महाराष्ट्र धर्म', असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
@RajThackeray आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतलात आपण लवकरच पूर्ण पणे बरे व्हाल हि आई भवानी कडे प्रार्थना
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2022
आपण मी कोरोनातं असताना माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती हे मी विसरलेलो नाही
राजकारणात वाद असावेत द्वेष नाही #महाराष्ट्र_धर्म
दरम्यान, राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे अधिक वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर म्हटले आहे की, शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या करण्यासाठी राज ठाकरे शनिवारी (ता. १८ जून) लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. याआधीदेखील राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाले होते. पण, तेव्हा त्यांच्या शरीरात कोरोनाचे डेड सेल्स आढळून आले होते. यामुळे त्यांना ॲनेस्थेशिया म्हणजे भुलीचे इंजेक्शन देता येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.