मनसेनंतर आता ठाकरे गटही मराठी पाट्यांसाठी आक्रमक; "मस्ती असलेल्या दुकानदारांना..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 01:36 PM2023-11-27T13:36:36+5:302023-11-27T13:37:23+5:30
सुप्रीम कोर्टाने दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत २५ नोव्हेंबरला संपली.
मुंबई - दुकाने आणि आस्थापना यावरील पाट्या मराठी भाषेत ठळक अक्षरात लावा, सरकारच्या कायद्याचे पालन करा असं सुप्रीम कोर्टाने म्हणत व्यापारांना २ महिन्यांची मुदत दिली होती.ही मुदत संपूनही अनेक दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत. यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत काहीठिकाणी पाट्या फोडल्या. आता या शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही उडी घेत मस्ती असलेल्या दुकानदारांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा आमदार अजय चौधरी यांनी दिला आहे.
शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याच्या विधानसभेत एकमताने मराठी पाट्यांबाबत कायदा मंजूर केला. या कायद्याविरोधात व्यापारी हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले परंतु तिथे त्यांना फटकारले. त्यानंतर आता हा कायदा असल्याने दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या कराव्यात यासाठी मतदारसंघात फिरून आढावा घेतला. ज्यांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या त्यांचे अभिनंदन केले आणि ज्यांनी अजूनही पाट्या लावल्या नाहीत त्यांना येत्या २ दिवसांत मराठी भाषेत पाट्या करा अन्यथा या पाट्या आमच्या स्टाईलने काढून टाकू त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील असा इशारा त्यांनी दिला.
तसेच आमच्या आंदोलनात लोक मोठ्या प्रमाणात उतरले होते. दुकानदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र ज्या दुकानदारांना मस्ती आहे त्यांना शिवसेना स्टाईलने कारवाई करू. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट झाले आता मात्र दिरंगाई नाही. पाट्या बनवायला वेळ लागतो पण तुम्ही यापूर्वीच बनवायला हव्या होत्या. परंतु आता २ दिवसांची मुदत दिली आहे त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू. मराठीचा ध्यास, मराठी श्वास आहे. शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करतेय. मी लोकप्रतिनिधी असल्याने दुकानदारांनी वेळ मागितली. त्यामुळे २ दिवसांची मुदत दिलीय पण ते नाही केले तर मी स्वत:या पाट्या तोडून टाकेन असंही मी बजावलं असल्याचे आमदार अजय चौधरी यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत २५ नोव्हेंबरला संपली. त्यानंतर महापालिकेने दुकानदारांना नोटीस पाठवून २८ नोव्हेंबरपासून मराठी पाटी नसेल तर कारवाई करू असा इशारा दिला आहे. तत्पूर्वी मनसेने अनेक ठिकाणी मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन दिले. काही ठिकाणी पाट्याही तोडण्यात आल्या. आता शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठी पाट्यांसाठी मुंबईत पुन्हा आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.