महिनाभरानंतर समजले ज्यांंच्यासाठी प्रार्थना केली ते या जगातच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:05 AM2021-05-15T04:05:33+5:302021-05-15T04:05:33+5:30
कोरोनामुळे आधी मुलगा, नंतर पतीला गमावलेल्या वृद्धेची व्यथा महिनाभरानंतर समजले ज्यांंच्यासाठी प्रार्थना केली ते दाेघेही या जगातच नाहीत कोरोनामुळे ...
कोरोनामुळे आधी मुलगा, नंतर पतीला गमावलेल्या वृद्धेची व्यथा
महिनाभरानंतर समजले ज्यांंच्यासाठी प्रार्थना केली ते दाेघेही या जगातच नाहीत
कोरोनामुळे आधी मुलगा, नंतर पतीला गमावलेल्या वृद्धेची व्यथा
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना झाल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. आधी मुलगा हे जग सोडून गेला. त्यापाठोपाठ पतीलाही प्राण गमवावा लागला; पण तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. दाेघे साेडून गेल्याचे तिला माहीत नव्हते. ती रुग्णालयातून पती आणि मुलाला लवकर बरे कर, म्हणत देवाकडे पार्थना करत होती. अखेर महिनाभरानंतर तिला हे कटू सत्य समजले अन् जबरदस्त मानसिक धक्का बसला.
रुग्णालयात उपचार घेताना आणि कोरोनामुक्त होऊन बाहेर पडल्यानंतरही या ६५ वर्षीय वृद्ध मातेची पती आणि मुलाच्या मोबाइलवर सतत व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी बाेलण्यासाठीची धडपड सुरूच होती. मात्र, ते दोघेही या जगात नाहीत, हे या मातेला सांगण्याची हिंमत काेणालाच हाेत नव्हती. अखेर, काेराेनामुक्त झाल्यानंतर शुक्रवारी महिनाभराने तिला समजले की, ज्यांच्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत ते आपल्याला कधीच सोडून गेले आहेत. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना मुलुंडमध्ये घडली असून क्षणार्धात हसतेखेळते कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झाले. तेव्हापासून ही ६५ वर्षीय वृद्धमाता मानसिक धक्क्यात आहे.
सध्या ही वृद्ध माता आपली मुलगी आणि जावयासोबत राहत आहे. ८ महिन्यांपूर्वीच त्यांच्या ३२ वर्षीय मुलाचे लग्न झाले. त्यामुळे घरातले सर्वच आनंदात होते. मार्चअखेरीस घरातील मंडळींना ताप, थकवा जाणवू लागला. मेडिकलमधून औषधे घेऊन आज बरे वाटेल, उद्या बरे वाटेल, या आशेवर या कुटुंबाने १० दिवस आजारपण अंगावर काढले. मुलाला श्वास घेण्यास जास्तच त्रास होऊ लागल्याने स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड चाचणी केली. त्यात सून सोडून अन्य तिघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तिघांनाही उपचारांसाठी मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
* मानसिक धक्का सहन करणे कठीण
मुलाची प्रकृती जास्तच बिघडल्याने त्याला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. तेथे प्राणवायूची पातळी कमी झाल्याने तीन दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे ६९ वर्षीय पतीला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे त्यांच्यासाठी आयसीयू बेडचा शोध सुरू झाला. जवळपास १० दिवस नातेवाइकांनी आयसीयू बेडचा शोध घेतला. मात्र, बेड उपलब्ध झाला नाही. अखेर त्यांचाही मृत्यू झाला. कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेली ही माता हा धक्का सहन करू शकणार नाही, याची जाणीव असल्याने ती बरी हाेईपर्यंत नातेवाइकांनी तिला काहीच सांगितले नव्हते. मुलगा आणि पती निधनाच्या दु:खामुळे या मातेला मानसिक धक्का बसला असून हे सर्व सहन करणे तिच्यासाठी अवघड जात आहे.
......................................