Join us

आईच्या हत्येनंतर स्वत:ही करणार होता आत्महत्या

By admin | Published: February 02, 2016 3:56 AM

कपडे धुण्याच्या धोपाटण्याने वृद्ध आईची निर्घृण हत्या करणारा तेजस रमेश संघवी (३७) हा तरुण स्वत:चेही जीवन संपविणार होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली

मनीषा म्हात्रे , मुंबईकपडे धुण्याच्या धोपाटण्याने वृद्ध आईची निर्घृण हत्या करणारा तेजस रमेश संघवी (३७) हा तरुण स्वत:चेही जीवन संपविणार होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. आपल्या मृत्यूनंतर वृद्ध आईचे काय होईल, या चिंतेने आपण हे पाऊल उचलल्याचे तेजसने जबाबात सांगितले.दादर पश्चिमेकडील गोखले रोड येथील उच्चभ्रू गोपाळ धाम इमारतीच्या पहिल्या मजल्यावर संघवी कुटुंबीय राहतात. १९ वर्षांपूर्वी तेजसच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तेजस ६७वर्षीय आई रेखासोबत राहत होता. दादर स्टेशन परिसरात त्यांचे कपड्याचे दुकान आहे. वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर तेजस चुलत्यांसह दुकान सांभाळत होता. घरात त्याच्या लग्नासाठी अनेक स्थळे आली. मात्र कुंडलीत दोष असल्याचे कारण काढत तो सतत टाळाटाळ करत असे. गेल्या १० महिन्यांपासून तो तणावाखाली गेल्याने दुकानात जाणे त्याने अचानक बंद केले; आणि स्वत:ला घरातच कोंडून घेतले. चुलते घरात आले की तो बाथरूममध्ये लपून राहत असे. त्याच्या अशा विक्षिप्त वागण्याने त्याचे चुलते घरखर्च भागवत होते. रेखा तेजसला दुकानावर जाण्यासाठी आग्रह धरायच्या; मात्र तेजस त्यांच्यासोबत वाद घालत असे. अनेकदा घरातील वस्तूंची तो आदळआपट करायचा. वस्तू इमारतीतून खाली फेकणे, गोंधळ घालणे असे प्रकार तर नित्याचे झाले होते, असे सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे अनेकदा सोसायटीतील रहिवासी त्याची समजूत काढत असल्याचे शेजारच्यांचे म्हणणे आहे.गेल्या अनेक दिवसांपासून तो आईच्या भवितव्याबाबत चिंतित होता. आपल्या मृत्यूनंतर आईचा सांभाळ कोण करणार? नातेवाईक तिचा छळ करतील, या विचाराने तो त्रस्त होता. अखेर त्याने स्वत:सह तिलाही संपविण्याचा निर्णय घेतल्याचे तेजसने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. ‘वेळीच औषधोपचार हवे होते’स्किझोफ्रेनियामुळे विचार, धारणा आणि कृती या तिन्ही गोष्टी बिघडलेल्या असतात. मग त्यांच्या भावनांना आणि विचारांना मर्यादा राहत नाही. प्रत्येक वेळी रुग्णाच्या मनात संशयवृत्ती बळावत जाते. संशयातून स्वत:ला कोंडून घेणे, नातेवाइकावर संशय घेणे असे प्रकार रुग्ण करू लागतो. वेळीच औषध घेतल्याने यावर नियंत्रण आणणे शक्य असते. तेजसच्या कुटुंबीयांनी वेळीच उपचार करणे गरजेचे होते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेल्या १० महिन्यांपासून स्वत:ला कोंडून घेणे, नातेवाइकांपासून लपणे ही वागणूक समजून घ्यायला हवी होत्या. नातेवाईक आपल्यासह आईलाही ठार मारतील, या संशयातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टर म्हणाले.