Join us  

नांदेडनंतर नागपूर, सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी; विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 12:45 PM

शिवसेना खासदार संजय राऊतांसह आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते, असा सवाल केला आहे.  

मुंबई - राज्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. नांदेडमध्ये २ दिवसांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ११ बालकांचा समावेश आहे. तर, संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातही २४ तासांत १४ रुग्ण दगावले आहेत. त्यानंतर, आता नागपूरच्या सरकारी रुग्णालयातही २ दिवसांता २५ रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरुन, विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊतांसह आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते, असा सवाल केला आहे.  

राज्यातील शासकीय रुग्णालयात सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. आधी नांदेड, नंतर छत्रपती संभाजी महाराज नगर... आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात गेल्या दोन दिवसात २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या सरकारच्या काळात आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर पोहोचली आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. 

प्रशासनातील गैरव्यवहार, औषधांचा अपुरा साठा, डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अशा अनेक बाजू पुढे आल्या आहेत. त्यावर गांभीर्याने काम करण्याची सरकारला गरज आहे. अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणे ही बालिश कृती करून गोष्टी सुरळीत होणार नाहीत. कारण इथे प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे. दुर्दैवाने निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान  असे ब्रिद वाक्य वापरणारे, या गंभीर परिस्थितीत ढिम्म बसले आहेत. सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी आहे. राज्यात ही परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते हा खरा सवाल आहे?, असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे. 

नागपुरात २ दिवसांत २५ दगावले

नागपुरात २ ऑक्टोबरला मेडिकल रुग्णालयामध्ये २४ तासांत १६ आणि मेयो रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. मेडिकलमध्ये दगावलेल्या रुग्णांपैकी ८ रुग्णांना खासगी रुग्णालयांतून अत्यवस्थ अवस्थेत येथे हलविण्यात आले होते. या रुग्णांना मेडिकलच्या डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात ठेवले. परंतु २४ तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. मेयोतही हीच स्थिती होती. यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. 

सखोल चौकशी करू, कारवाई होणार - मुश्रिफ

मी आयुक्तांना आणि संचालकांना कालच नांदेडला पाठवलं असून या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार आहे. नांदेड रुग्णालयात झालेल्या २४ मृत्यूंची आणि आणखी ७ मृत्यूंची माहिती मिळाली आहे. म्हणजे एकूण मी ३१ मृत्यूंची नोंद झाली असून एकेक मृत्यूप्रकरणाची चौकशी केली जाईल, तसेच दोषांवर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफ यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसनागपूरशासकीय रुग्णालय घाटीआरोग्य