मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नाशिक पाठोपाठ सोलापुरातील ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले. या कारवाईत दोघांकडून १६ कोटींचे ८ किलो एमडी साठा जप्त केला आहे. फॅक्टरी मधून १०० कोटी रूपये किंमतीचा सुमारे ५० ते ६० किलो निर्माणाधिन मेफेड्रोन (एमडी) च्या कच्च्या साठ्यासह फॅक्टरी सील करण्यात आली आहे. सोलापुरातील दोन सख्या भावंडाकडूनच हा ड्रग्ज कारखाना चालविण्यात येत होता. राहुल किशन गवळी आणि अतुल किशन गवळी अशी अटक करण्यात आलेल्या भावंडाची नावे आहे. दोघेही पूर्वी केमिकल फॅक्टरीमध्ये काम करायचे. यातूनच त्यांनी ड्रग्ज तयार कारण्यासंबंधित प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. यातूनच सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसी परिसरातील २१ हजार स्क्वेअर फुटाचा कारखाना भाड्याने घेतला. तेथेच तीन लॅब तयार करत ड्रग्ज बनविण्यास सुरुवात केली. गेल्या सात ते आठ महिन्यापासून त्यांचा हा कारखाना सुरु होता. सुरक्षेसाठी त्यांनी दोन सुरक्षा रक्षक नेमले. दोघेच सर्व हाताळत होते. दीड महिन्यापूर्वी ड्रग्ज घेऊन मुंबईत हालचाली वाढल्या.
याच, दरम्यान गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक या दोघांची टीप लागली. त्यानुसार,पथकाने सापळा रचून दोघांना खारमधून अटक केली. त्यांच्याकडून जवळपास १० कोटी ८० हजार किंमतीचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत पथकाने तपास सुरु केला. चौकशीत दोघांच्या फॅक्टरीचे कनेक्शन उघड होताच पथकाने सोलापुरात कारवाई केली. सदर फॅक्टरीमध्ये एकुण ३.००६ किलो तयार मेफेड्रोन (एमडी) मिळून आला असून, अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे ६ कोटी १ लाख २० हजार रूपये एवढी किंमत आहे. सदर फॅक्टरीमध्ये अंदाजे १०० कोटी रूपये किंमतीचा सुमारे ५० ते ६० किलो निर्माणाधिन मेफेड्रोन (एमडी) चा कच्चा साठा देखील मिळून आला आहे. फॅक्टरीला टाळे ठोकण्यात आले आहे. दोन्ही आरोपीना १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ममता कुलकर्णी ड्रग्ज प्रकरण
गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केलेल्या कारखान्यापासून अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर असलेल्या २०१६ मध्ये ठाणे पोलिसांनी तब्बल दोन हजार कोटींचे ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा जोडीदार विकी गोस्वामी आरोपी आहेत. सोलापुरातील एका कारखान्यातून पोलिसांनी २० टन इफेड्रिन जप्त केले होते. याच कारखान्यापासून १०० मीटरच्या अंतरावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी एवढया मोठ्या प्रमाणात दुसरी कारवाई झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.नाशिकमधून ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त
गुन्हे शाखेच्या यापूर्वीच्या कारवाईत नाशिकमधील फॅक्टरी उद्ध्वस्त करत ३०० कोटींचे ड्रग्ज करण्यात आले होते.