मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. गोऱ्हेंच्या प्रवेशानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 'यह मोह मोह के धागे' अशा शब्दांत त्यांनी गोऱ्हेंचा समाचार घेतला.
आज नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितलं आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन ही शिवसेना पुढे जात असून हीच खरी शिवसेना असल्याचं त्यांनी म्हटलं. याशिवाय सुषमा अंधारेंबद्दल प्रश्न विचारला असता, सटरफटर लोकांमुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नसते, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आणखी नेते उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी फडणवीसांनी भाजप आणि शिवसेना यांची युती भावनिक असून नीलम ताईंशी आमचे व्यक्तिगत संबंध असल्याचे म्हटले.
आदित्य ठाकरेंचा घणाघात नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आदित्य ठाकरेंनी टीका केली. "स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी ही लढाई आहे. एकाच व्यक्तीला ४ वेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी उद्धवसाहेबांनी दिल्यावरही, २१ वर्ष तिथे असूनही, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही... एकच गाणं आठवतं, यह मोह मोह के धागे... खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो", अशा शब्दांत ठाकरेंनी गोऱ्हेंवर टीका केली.