मुंबई : सामान्यांना कांदा खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले असताना, आता वांगी, भेंडीनेही शंभरी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात भेंडीला १०० ते १२० रुपये भाव मिळत आहे, तर वांगी १०० ते १३० रुपये दराने मिळत असताना, मात्र पालेभाज्यांचे दर नियंत्रणात आहेत.
अवकाळी पावसामुळे राज्यातील कांद्याच्या पिकावर मोठा परिणाम झाला. कित्येक ठिकाणी कांद्याचे पीक घेता आले नाही, तर ज्या ठिकाणी कांद्याचे पीक होते, त्या पिकाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात जुना कांदा १२० तर नवा कांदा १०० रुपये किलो दराने मिळत आहे. आता कांद्यानंतर वांगी आणि भेंडीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पावसामुळे उपन्न कमी आल्याने, गेल्या काही दिवसांत भेंडी आणि वांग्याची आवक कमी झाली आहे. गेले काही दिवस ६० ते ८० रुपये किलो दराने मिळणारी वांगी आणि भेंडीच्या दरात दुपटीने वाढ होऊन ते १०० ते १३० पर्यंत पोहोचले आहेत.
दुसरीकडे पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. मेथीची जुडी १० ते २० रुपये, पालक १५ ते २० रुपये, कोथिंबीर २० रुपये दराने मिळत आहे, असे भाजी विक्रेता रतन शिर्के यांनी सांगितले, तर आधीच कांदा महाग झाला असताना, त्यामध्ये वांगी आणि इतर भाज्यांची भर पडली आहे, असे ग्राहक सुनीता हुल्ले म्हणाल्या. ‘दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. कांद्यासोबत इतर भाज्यांचे भाव वाढत आहेत. सरकारने कमी दरात भाज्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत,’ असे शीतल मोरे यांनी सांगितले.