मुंबई : लोअर परळ उड्डाणपुलाची (डिलाईल रोड पूल) एक मार्गिका १ जूनपासून खुली केल्यानंतर १८ सप्टेंबरपर्यंत दुसरी मार्गिका खुली करण्यात येणार होती. मात्र दिवाळी झाल्यानंतरही पालिकेकडून दुसरी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात न आल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेने गुरुवारी रात्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात रेल्वे वर्कशॉप ते डिलाईल रोड दिशेने जाणारी मार्गिका खुली केली.
दरम्यान, दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण होत असून अंतिम कामे लवकर पूर्ण करून येत्या तीन-चार दिवसांमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशा सूचना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पूल विभागाला दिल्यामुळे पालिकेकडून शुक्रवारी हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला. लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड, भायखळा परिसरात वाहतुकीचा कणा असलेला लोअर परळ (डिलाईल रोड) पूल आहे. डिलाईल पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या मार्गिकेला मात्र ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचे दिसत आहे. यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत होती. याची दखल घेत गुरुवारी रात्री आदित्य ठाकरे यांनी या बाजूवरील बॅरिकेड्स हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. याघटनेमुळे सर्वसामान्य मुंबईकर मात्र भरडला गेला.
काय आहे डिलाईल रोड पुलाची स्थिती ?
लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक झाल्याच्या कारणास्तव देखभालीसाठी २४ जुलै २०१८ पासून वाहन आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. या पुलावर पहिला गर्डर बसवण्याचे काम जून २०२२मध्ये पूर्ण करण्यात आले. दुसरा गर्डर २४ सप्टेंबर २०२२ रोजी बसवण्यात आला. डिलाईल पुलाच्या लोअर परळ स्थानकाच्या पश्चिम दिशेची गणपतराव कदम मार्ग ते ना. म. जोशी मार्ग असा वाहतुकीचा पर्याय देणारी बाजू जून महिन्यात खुली करण्यात आली होती. डिलाईल पुलाच्या एका मार्गिकेचे काम १८ सप्टेंबर २०२३ रोजी रोजी पूर्ण झाले होते व मार्गिका दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती.
पुलाचे काम पूर्ण होऊनही फक्त उद्घाटनासाठी हा पूल खुला केला गेला नसल्याचा दावा ठाकरे यांनी करत पालिका प्रशासनावर टीका केली मात्र डिलाईल पुलाच्या बांधणीमध्ये रेल्वे परिसराला जोडून असणारे ना. म. जोशी मार्गावर अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेचे गर्डर टाकण्याचे काम ऑगस्ट २०२३ महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरणाचे काम ही १० नोव्हेंबर रोजी पूर्ण झाले आहे. दरम्यान आता पथदिवे, रंगकाम, लेन मार्किंग, सिग्नल यंत्रणा आदी कामे सुरू आहेत. या कामांच्या पूर्ततेनंतर हा पूल वाहतुकीसाठी येत्या ३ ते ४ दिवसांत खुला करणे शक्य होईल, अशी माहिती उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.