पवार-शहा भेटीच्या चर्चेनंतर भाजपा आमदाराने शेअर केला 'तो' व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 11:00 AM2021-03-29T11:00:12+5:302021-03-29T16:44:58+5:30
भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील एक जुना व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. एका गुजराती वर्तमानपत्राने या तिघांमध्ये अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याचे वृत्त दिले होते. (That meeting did not take place, only the Pawar-Shah meeting was discussed, even the NCP denied it) त्यानंतर, राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या. भाजपा-राष्ट्रावादी पुन्हा म्हणणार का, अशीही चर्चा रंगली. त्यात, भाजपा आमदाराने देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील एक जुना व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. एकीकडे शरद पवार-अमित शहा भेटीची चर्चा असतानाच दुसरीकडे भाजपा नेत्यांकडून अशाप्रकारे सिम्बॉलिकपणे राजकीय बदलाची हवा फुकण्यात येत आहे. राम सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटंवरुन व्हिडिओ शेअर करुन पिन टॅगही केलाय. त्यामध्ये, मै समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा ... असं फडणवीस म्हणताना दिसत आहेत.
मै समंदर हूं लौटकर वापस आऊंगा @Dev_Fadnavispic.twitter.com/2i5ffL2ogs
— Ram Satpute (@RamVSatpute) March 28, 2021
शरद पवार अहमदाबादला होते, पण भेट नाही
राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि प्रफुल पटेल शुक्रवारी, २६ मार्च रोजी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कुटुंबातील विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अहमदाबादेत आले. वस्तुत: हा विवाहसोहळा शनिवारी, २७ मार्च रोजी होता. परंतु अदानी परिवारातील आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते आदल्या दिवशीच अहमदाबादमध्ये आले. पवार आणि पटेल दोघेही जण अहमदाबादेत असतानाच अमित शहा यांचेही शहरात आगमन झाले. मात्र, पवार आणि पटेल यांनी शहा यांची भेट घेतली नाही. या तिघांमध्ये भेट झाल्याची नुसतीच चर्चा रविवारी प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती.
ही निव्वळ अफवा : नवाब मलिक
शरद पवार आणि अमित शहा यांच्यात कोणतीही भेट झालेली नाही. ही निव्वळ अफवा असून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी सायंकाळी स्पष्ट केले. यासंदर्भातील ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही.
गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम
रविवारी अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्याशी भेट झाली किंवा कसे, या प्रश्नावर थेट उत्तर न देता ‘राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात’, असे सूचक विधान करत संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला बगल देत शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावर मतप्रदर्शन करत भाजप तेथे प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा दावा केला.
योग्य वेळी सर्व उघड होईल
खुद्द शरद पवार यांनी या वृत्ताचे खंडन का नाही केले, असे विचारले असता ‘योग्य वेळी हे सर्व उघड होईल. पवार साहेबांची ती सवय नाही. ते योग्य वेळेची निवड स्वत:च करतात’, असे राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले.
हे तर केवळ कल्पनारंजन
- उष्मा मल्ल
अहमदाबाद : शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतली, हे केवळ कल्पनारंजन आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. पवार आणि पटेल काही संस्थांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादला आले होते. योगायोगाने अमित शहा हेही शहरात होते; परंतु त्यांची भेटच झाली नसल्याने बैठकीचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे या तिघांमध्ये बैठक झाली आणि त्यात सरकार बनविण्याची चर्चा झाली यात काही तथ्य नाही.