Traffic : ‘फ्री वे’वर कुठे ५० तर कुठे १०० रुपये दिल्यानंतर ‘अवजड’ गाड्यांनाही प्रवेश
By नितीन जगताप | Published: February 1, 2023 08:53 AM2023-02-01T08:53:14+5:302023-02-01T08:54:35+5:30
Traffic : पूर्वमुक्त मार्ग अर्थात फ्री वेवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असतानाही वाहतूक पोलिसांच्या हातावर कधी ५० तर कधी १०० रुपयांची चिरीमिरी टेकवत अवजड वाहनांचे चालक बिनधास्तपणे या मार्गावर वाहने दामटत आहेत.
- नितीन जगताप
मुंबई : पूर्वमुक्त मार्ग अर्थात फ्री वेवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असतानाही वाहतूक पोलिसांच्या हातावर कधी ५० तर कधी १०० रुपयांची चिरीमिरी टेकवत अवजड वाहनांचे चालक बिनधास्तपणे या मार्गावर वाहने दामटत आहेत. वाहतूक पोलिसही अशाच वाहनांना ‘आगे बढो’चा इशारा करीत मार्ग मोकळा करून देत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून उघडकीस आले आहे.
नियमांच्या या मोडतोडीमुळे या मार्गावर अपघात होण्याचा धोका मात्र कमालीचा वाढला आहे. नवी मुंबईतून मुंबईत आल्यानंतर चेंबूर ते दक्षिण मुंबईत प्रवासाचा वेळ वाचावा, या हेतूने हा फ्री वे सुरू करण्यात आला आहे. वाहतूक वेगवान राहावी यासाठी या मार्गावर अवजड वाहने आणि दुचाकीस्वारांना बंदी घालण्यात आली आहे मात्र या नियमांचे उल्लंघन करत अनेक अवजड वाहने सर्रासपणे या मार्गाचा वापर करत असल्याचे दिसून आले.
शुक्रवारी लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीने जिजामाता पूल येथून एका टेम्पोतून प्रवास केला. जिजामाता पुलाजवळ त्या टेम्पोचालकाने एका वाहतूक पोलिसाला ५० रुपये दिले. ते हाती पडताच वाहतूक पोलिस शिपायाने चालकाला पुढे जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर पुढे वडाळा वाहतूक पोलिस चौकी लागली. टेम्पो चालकाने आपल्या शेजारी बसलेल्या प्रतिनिधीच्या हाती ५० रुपये देऊन ते तेथील पोलिस शिपायाला देण्यास सांगितले.
मात्र तेथील शिपायाने केवळ ५० रुपये घेण्यास नकार देत १०० रुपयांची मागणी केली. चालकाने बसल्या जागेवरुनच ५० रूपये स्वीकारण्याची विनंती केली मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत शिपायाने त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यातून टेम्पोचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाईलाजाने टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला १०० रुपये दिले.
१५ मिनिटांत १५ वाहने
जिजामाता नगर पुलाजवळ एंट्री पॉइंटजवळ अवघ्या १५ मिनिटांत तब्बल १५ अवजड वाहने गेल्याचे दिसून आले.
दोन वर्षांपूर्वी मध्यरात्री फ्री वेवरील एका ट्रकवरचे ओडिसी कार्गो घसरून खालील रस्त्यावर पडले होते.
फ्री वेवर अवजड वाहने येणार नाहीत याची खबरदारी घेऊ तसेच संबंधित विभागातील वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
- प्रवीण पडवळ, सहपोलिस आयुक्त (वाहतूक)
वडाळा येथील शांतीनगर, रे रोड भागातून फ्री वेवर अवजड वाहतूक सुरू आहे. वाहने भारक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करतात. त्यामुळे रस्त्यांचे नुकसान आणि अपघात होण्याचा धोका आहे मात्र चिरीमिरीसाठी पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात.
- प्रदीप वाघमारे, अवजड वाहतूक विभाग प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
दररोज मी ५० रुपयेच देतो पण आजचा शिपाई ऐकत नसल्याने त्याला १०० रुपये द्यावे लागले. या दोन्ही चौक्यांवर इतकेच देतो. वाडीबंदरला तर फक्त २० ते ३० रुपयांत काम होते. - अवजड वाहनाचा चालक