पेंटाग्राफ दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासन पादचारी पुलालगत उभारणार सुरक्षा जाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 05:10 AM2019-05-04T05:10:39+5:302019-05-04T05:10:53+5:30
लोकल खोळंबा टाळण्यासाठी घेतला निर्णय
मुंबई : हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकावर अज्ञात व्यक्तीने कंबरपट्टा ओव्हरहेड वायरवर टाकून लोकल सेवा खंडित केली होती. त्या वेळी तब्बल दोन तास लोकल खोळंबा झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप झाला. त्यामुळे आता पेंटाग्राफ दुर्घटनेवर उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलालगत सुरक्षा जाळी उभारण्याचा तसेच जेथे जाळ्या आहेत त्यांची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील मध्य आणि हार्बर स्थानकावरील पादचारी पुलांवरील सुरक्षा जाळीची उंची वाढविण्याचे काम लवकरच करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील ७ स्थानकांची पाहणी करून जाळीची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
ओव्हरहेड वायरवर कोणत्याही प्रकारची वस्तू फेकल्यास किंवा पडल्यास लोकलवरील पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरचा संपर्क तुटून लोकल सेवा विस्कळीत होते. नुकत्याच घडलेल्या घटनेत ओव्हरहेड वायरवर कंबरपट्टा टाकण्यात आला होता. यासह अनेक वेळा नायलॉनची वस्तू, पतंगाचा मांजा अडकल्याचे प्रकार घडले आहेत. हार्बर मार्गावर असे प्रकार जास्त घडत असल्याने पादचारी पूल आणि ओव्हरहेड वायर यांच्यातील अंतर पाहून पादचारी पुलावर सुरक्षा जाळी बसविण्यात येणार आहे. काही स्थानकांवर सुरक्षा जाळी आहे, मात्र या जाळीची उंची कमी असल्याने आता ती वाढविण्यात येईल.
यासंदर्भात लवकरच हार्बर मार्गावरील शिवडी, वडाळा, कॉटनग्रीन, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर आणि गोवंडी या स्थानकांची पाहणी करण्यात येणार आहे. सर्वच पुलांची पाहणी करून त्यानंतर सुरक्षा जाळ्या लावण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.