मी सोशल मीडिया सोडू इच्छितो अशा प्रकारचं एक आश्चर्यकारक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी देखील ट्विट करुन नरेंद्र मोदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहे.
Narendra Modi यांच्या 'संन्यासा'च्या घोषणेनंतर राज ठाकरेंची 'ती' पोस्ट चर्चेत!
अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काहीवेळा छोटे निर्णयही आपल्या आयुष्यात कायमस्वरुपी मोठे बदल घडवू शकतात. त्यामुळे मी देखील माझे नेते नरेंद्र मोदी यांना फॉलो करणार आहे असं सांगितले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अमृता फडणवीस यांनी देखील सोशल मीडियाला रामराम करणार असल्याचे संकेत दिले आहे.
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडू इच्छित असल्याचे सांगितले. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्युब येथील सगळ्या अकाऊंट्समधून बाहेर पडून ही अकाऊंट्स बंद करण्याचा विचार असल्याचे नरेंद्र मोदींनी ट्विट करुन सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठा त्याग करणार; सोशल मीडियावर भूकंप
नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान ह्या वेगवान राजकीय प्रवासात सोशल मीडियाची त्यांना मोठी मदत झाली आहे. नरेंद्र मोदींचे ट्विटरवर ५३.३ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ४४, ५९७, ३१७ जण त्यांना फॉलो करतात. तर इन्स्टाग्रामवर त्यांचे ३५.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत.