Join us  

राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार 'वर्षा'वर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 12:24 PM

शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्याविरोधात वेगळा गट बनवत ५० आमदार आणि भाजपाच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वर्तुळात गाठीभेटींचा सिलसिला वाढला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अलीकडेच वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतले होते. तर शिंदेही राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणेश दर्शन आणि राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. आता मनसेचे नेते वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. 

राज ठाकरेंचे महत्त्वाचे शिलेदार असणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे वर्षा निवासस्थानी गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आमदार रवींद्र फाटक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गणेश दर्शनासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनसे नेत्यांची भेट झाली. या नेत्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. मनसे नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढती जवळीक आगामी काळात युतीच्या माध्यमातून पाहायला मिळेल का अशी चर्चा सुरू आहे.   

शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्याविरोधात वेगळा गट बनवत ५० आमदार आणि भाजपाच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेनेही एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देत बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले होते. मनसे राज्य सरकारमध्ये सहभागी होणार असंही बोलले जात होते. परंतु अद्याप यावर कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिंदे गट सातत्याने जवळ येताना दिसत आहे. 

आमचे दैवत एकच बाळासाहेबबाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना अभिप्रेत असणारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. शिवसेना-मनसे एकत्र यावेत अशी इच्छा बाळासाहेब ठाकरेंनी व्यक्त केली होती. हे जर सत्यात उतरत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु यावर आत्ताचं सांगणं कठीण होईल. मन जुळत असतील. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत असतील ते हे नैसर्गिक आहे असं सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी मनसे-शिंदे गट युतीचे संकेत दिले होते.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेएकनाथ शिंदे