मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या निमित्ताने राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी अस्तित्वात आली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाने एकत्रित येत निर्माण केलेल्या आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला. या राजकीय घडामोडींवर भाजपा नेते एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी, एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना टार्गेट केलंय.
एकनाथ खडसेंनी सोमवारी माध्यमांशी बोलताना, सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर राजीनामा दिला तर आश्चर्य वाटायला नको, असे म्हटले होते. खडसेंचं ते वाक्य खरं ठरलंय. 'मी कालच माझ्या भाषणात सुप्रिम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तर आश्चर्य वाटायला नको, असं म्हटलं होतं आणि आज तीच बातमी आली. अजित पवारांना व्हीप काढण्याचा अधिकार राहिला नव्हता, ते राष्ट्रवादीचे गटनेते राहिले नव्हते. म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला असावा, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. तसेच, राज्यातील या घाणेरड्या राजकारणालाचाही त्यांनी समाचार घेतलाय. केवळ भाजपा आणि शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या लढाईसाठी हे घाणेरडे राजकारण पाहायला मिळालं. आज, फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी राजीनामे द्यावे लागले, असेही खडसेंनी म्हटलंय.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बहुमत सिद्ध करणं जरासं अवघड होतं. कारण, अजित पवार यांच्याकडे आमदारांचं संख्याबळ राहिलं नव्हत. त्यामुळे, बरं झालं राजीनामा दिला. इज्जत तरी वाचली, असा टोला खडसेंनी अजित पवारांना लगावला.दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीच्या निमित्ताने राज्यात पवार-ठाकरे घराण्याचा नवा अध्याय पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुप्रिया सुळे ही नवीन पिढी एकत्र आली. अजित पवारांच्या बंडामुळे सुरुवातीला महाराष्ट्र विकास आघाडीत संघर्ष पाहायला मिळाला. पहिल्यांदाच राजकीय घडामोडीत प्रतिभा पवार यांनी कुटुंब सावरण्यासाठी सहभाग घेतला.