चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर आज भाजप प्रवेशाचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 06:25 AM2019-07-31T06:25:08+5:302019-07-31T06:25:30+5:30
संदीप नाईक, शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर यांच्यासह चित्रा वाघ करणार पक्षांतर
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशाचा ‘मेगा शो’ बुधवारी मुंबईत गरवारे क्लब येथे होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. प्रवेश करणाºया नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी असणार आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाचा हा ‘मेगा शो’ ठरण्याची शक्यता आहे. आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक तसेच काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्या कोळंबकर यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. शिवेंद्रसिंहराजे साताºयातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ते पक्ष सोडणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यासाठी शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे यांचा वाद मिटवण्याचाही प्रयत्न झाला. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपमध्ये जाणार आहेत.
शरद पवार यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाºया मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव यांनी पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडल्यानेच आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. तर कोळंबकर यांनी आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाचा राजीनामा दिला होता. कोळंबकर हे पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाविषयी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेत्यांनी म्हात्रे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी नाराजी कायम ठेवून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर भूमिका स्पष्ट केली.