मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरावरील धूरक्याचे प्रमाण दुसऱ्या दिवशीही कायम असून, अंधेरी परिसराची सर्वाधिक प्रदूषित परिसर म्हणून ‘सफर’ने नोंद केली आहे. अंधेरीतील धूलिकणांचे प्रमाण ३५७ पार्टिक्युलेट मॅटर एवढे नोंदविण्यात आले आहे. तत्पूर्वी देशातील विविध शहरांतील प्रदूषणाचा विचार करता दिल्ली पहिल्या स्थानावर असून, मुंबई दुसºया स्थानावर आहे. तर त्यानंतर अहमदनगर आणि पुणे येथेही प्रदूषण वाढत असल्याचे ‘सफर’ने नोंदविले आहे.उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने थैमान घातले असतानाच दिल्लीमधील धूरक्याचे प्रमाणही वाढत आहे. ‘सफर’च्या नोंदीनुसार मंगळवारी दिल्लीतील धूलिकणांचे प्रमाण ३८५, मुंबईतील २३९, अहमदनगर येथील १४६ आणि पुणे येथे धूलिकणांचे प्रमाण १११ पर्टिक्युलेट मॅटर एवढे नोंदविण्यात आले आहे. देशातील या चारही शहरांची तुलना केली असता दिल्ली आणि मुंबई धूरक्यात हरविल्याचे चित्र आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली बांधकामे, रस्त्यांची कामे, धूळ, धुके आणि त्याच्या मिश्रणाने निर्माण होणारे धूरके याचा फटका मुंबईकरांना बसत आहे. मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता अंधेरी, बीकेसी, बोरीवली, मालाड, माझगाव आणि नवी मुंबई येथे धूलिकणांचे प्रमाण अधिक नोंदविण्यात आले आहे. या ठिकाणांवरील हवेची गुणवत्ता खालावली आहे.
वाढत्या प्रदूषणात दिल्लीनंतर मुंबईचा नंबर, हवेची गुणवत्ता घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 7:11 AM