'ताई नको, राजीनामा नाही'; रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच महिलांना आलं रडू; भाषणही थांबवल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 08:47 AM2022-03-24T08:47:27+5:302022-03-24T08:51:18+5:30

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.

After Rupali Chakankar of NCP resigned from the post of women state president, women in the party started crying | 'ताई नको, राजीनामा नाही'; रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच महिलांना आलं रडू; भाषणही थांबवल!

'ताई नको, राजीनामा नाही'; रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच महिलांना आलं रडू; भाषणही थांबवल!

googlenewsNext

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (NCP Rupali Chakankar) यांनी बुधावारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडण्याचा निर्णय घेतला. चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला. त्यानंतर बैठकीत एकच गोंधळ उडाल्याचं दिसून आलं.

रुपाली चाकणकर भाषणात म्हणाल्या की, महिला प्रदेशाध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल मा. जयंत पाटील आणि पक्षाचे आभार मानते. माझ्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद देखील आहे. हे संविधानिक पद असल्याने त्या पदावर निष्पक्षपातीपणे काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी आज राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देते", असं चाकणकर म्हणाल्या.

रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतांय कळताच सभागृहात एकच गोंधळ झाला. बैठकीत उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांनी 'ताई नको, ताई नको', 'ताई, तुम्ही राजीनामा देऊ नका', असं म्हणू लागल्या. तसेच काही महिला पदाधिकाऱ्यांना अश्रूही अनावर झाले. यावेळी, रुपाली चाकणकर यांनी आपलं भाषण थांबवलं. महिलांचा आवाज शांत झाल्यावर त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री आदिती तटकरे स्तब्ध होऊन बघत होते.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता. आज त्यांनी राजीनामा दिला असून त्या ठिकाणी आता कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे. 

कोण आहेत रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर या दौंडच्या असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला. पण त्यात फारसं यश मिळालं नाही. लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या.  रुपाली चाकणकर यांना माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पण चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती. रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातून रूपाली चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध येऊ लागला.

२००२ पासून पुढची ५-६ वर्षं रुपाली चाकणकर यांनी परिसरातील महिला बचतगटासाठी काम केलं. पुढे चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. तिथून रूपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. रुपाली चाकणकर यांचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांची पुणे शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर २०१९ ला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अचानक भाजपात प्रवेश करून धक्का दिला. तेव्हा रुपाली चाकणकर यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 

Web Title: After Rupali Chakankar of NCP resigned from the post of women state president, women in the party started crying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.