छाननीत १४0 उमेदवार बाद
By Admin | Published: February 5, 2017 04:29 AM2017-02-05T04:29:01+5:302017-02-05T04:29:01+5:30
महापालिका निवडणुकीसाठी यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरताना गोंधळ उडाल्याने तब्बल १४० उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. मुंबई महापालिका
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरताना गोंधळ उडाल्याने तब्बल १४० उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. मुंबई महापालिका २०१७च्या निवडणुकांसाठी २२७ प्रभागांकरिता ३ फेब्रुवारीपर्यंत शेवटच्या दिवशी २ हजार ६८१ उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयाकडे दाखल झाले. या अर्जांची छाननी शनिवारी करण्यात आली. मात्र आॅनलाइन प्रक्रियेत पहिल्यांदा अर्ज भरताना अनेकांचा गोंधळ उडाला. त्यामुळे तांत्रिक कारणामुळे १४० उमेदवार बाद झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपाला शनिवारी गोरेगावात जोरदार धक्का बसला आहे. भाजपाचे प्रभाग क्रमांक ५८चे उमेदवार आणि जुहू येथील भाजपा नगरसेवक दिलीप पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ५८चे उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक राजन पाध्ये यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीवरून अर्ज बाद करण्यात आला. आता दिलीप पटेल यांचा पुत्र संदीप पटेल येथून निवडणूक लढवणार आहे.
पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरताना गोंधळ उडाल्याने तब्बल १४० उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक असली तरी राजकीय पक्षांनाही झटका बसला आहे. तर राजन पाध्ये यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रार अर्जात नमूद केले की, दिलीप पटेल यांचे नगरसेवक पद त्यांनी दिलेल्या जातीच्या खोट्या दाखल्यावरून रद्द करण्याची मागणी जयंती सिरोदिया यांनी उच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालाद्वारे त्यांचा जातीचा दाखला रद्द करून त्यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. या निर्णयाविरोधात दिलीप पटेल यांनी उच्च न्यायालयात दाद मागून त्यांच्या रद्दबातल केलेल्या प्रभाग क्रमांक ६३मधील नगरसेवकपदाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तसेच परत २०१७च्या पालिका निवडणुकीत निवडणूक लढण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दिलीप पटेल यांचा विनंती अर्ज रद्द करून परत नव्याने आदेश देता येणार नाही, असे सांगत आपला पूर्वीचा निकाल कायम ठेवला. मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यानुसार, जर एखाद्या नगरसेवकाचे नगरसेवकपद हे जातीच्या खोट्या दाखल्यामुळे रद्द झाले असेल तर तो अपात्र ठरतो. त्यामुळे दिलीप पटेल यांना प्रभाग क्रमांक ५८मधून परत निवडणूक लढवण्यास मज्जाव करून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी राजन पाध्ये यांनी केली. त्यामुळे दिलीप पटेल यांचा प्रभाग क्रमांक ५८मधील उमेदवारी अर्ज अखेर बाद केल्याचा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी दिल्याचे राजन पाध्ये यांनी सांगितले. याबाबत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)
न्यायालयात जाण्याची तयारी
- ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ असा काहीसा अनुभव राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांना आला आहे. शिवसेनेने दिलेला एबी फॉर्म ऐनवेळेस काढून घेतल्याने अडचणीत आलेल्या घुगे यांना काँग्रेसचा हात मिळाला.
पण तांत्रिक अडचण दाखवून त्यांचा अर्ज बाद झाला. यामुळे या आॅनलाइन प्रक्रियेविरोधात त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.