Join us

दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील रिअल इस्टेट बाजार सावरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:09 AM

मुंबई : सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबईतील रियल इस्टेट बाजार सावरत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपण्यास काही ...

मुंबई : सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबईतील रियल इस्टेट बाजार सावरत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपण्यास काही दिवस शिल्लक असतानाच मुंबईतील घर खरेदीने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत ही घर खरेदी कमी असली तरीदेखील कोरोनाच्या आधीच्या म्हणजेच २०१९च्या ऑगस्ट महिन्यातील घर खरेदीपेक्षा हा आकडा जास्त आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत बांधकाम क्षेत्राला फटका बसल्यामुळे सरकारने सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान मुद्रांक शुल्कात अनुक्रमे २ ते ३ टक्क्यांनी सवलत दिली होती. या सवलतीचा अनेकांनी फायदा घेतल्याने या महिन्यांमध्ये घर खरेदीमध्ये वाढ झाली होती. जुलै महिन्यापर्यंतची घर खरेदीची नोंदणी मार्च महिन्यातच करण्याची परवानगी दिल्याने यंदाच्या जुलै महिन्यापर्यंत घर खरेदीमध्ये वाढ दिसून आली. यानंतर आता ऑगस्टमधील घर खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत नाही. आता खऱ्या अर्थाने मुंबईत घर खरेदीची स्थिती कशी आहे हे दिसून येत आहे.

२०१९च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत ५ हजार ८७३ घरांची खरेदी झाली होती. यातून सरकारला ५०० कोटींचा महसूल मिळाला होता. २०२१च्या ऑगस्ट महिन्यातील घर खरेदीने आतापर्यंत सरकारच्या तिजोरीत ३१० कोटी महसूल जमा झाला आहे. २०२०च्या ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे केवळ २,६४२ घरांची खरेदी झाली होती. यातून सरकारला अवघा १७६ कोटींचा महसूल मिळाला होता. पुढील काळात घर खरेदीचा आलेख कसा राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. घर खरेदीला पुन्हा एकदा चालना मिळावी यासाठी विकासक मुद्रांक शुल्कात सवलत देण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. त्यामुळे आता सरकार यावर सकारात्मक प्रतिसाद देईल का याकडे बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.