Join us  

अजित पवार माईकवरून थेटच गरजले; सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 2:27 PM

छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक भाषण करत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आज घोषणा केली. 

१९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरु झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अवरित चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्याचा माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.

शरद पवारांच्या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले, काहींना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले. शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशा घोषणा शेकडो कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक भाषण करत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांनी देखील बोलावं, वडीलांना विनंती करावी, अशी विनंती केली. मात्र अजित पवारांनी माईक घेत ''सुप्रिया अजिबात बोलू नकोस..मी मोठा भाऊ म्हणून सांगतोय'', असं म्हणाले. उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी आमदारकी बाबत सर्व निर्णय तेच घेतील, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खांबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरु शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती देखील शरद पवारांनी गठीत केली आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. 

यासमितीत खालील सदस्यांचा समावेश आहे-

सदस्य- प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनील देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड.

इतर सदस्य- फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारसुप्रिया सुळे