शरद पवारांच्या पत्रानंतर झाला फोन, खतांच्या किंमती झटक्यात कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 10:57 AM2021-05-20T10:57:38+5:302021-05-20T10:58:52+5:30
मंत्री सदानंद गौडा यांनी शरद पवार यांच्या पत्राची दखल घेऊन त्यांच्याशी वाढलेल्या खतांच्या किंमतीसंदर्भात चर्चा केली. तसेच, पुढील दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासनही दिले होते
मुंबई - मोदी सरकारने (Narendra Modi government) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. डीएपीच्या कीमती वाढताच मोदी सरकारने यावरील सब्सिडीदेखील वाढवली आहे. जागतिक स्थरावर किंमती वाढल्या असल्या तरी डीएपी खताची एक बॅग शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांनाच मिळेल, असे सरकारने म्हटले आहे. तत्पू्र्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांना पत्र पाठवून खतांची दरवाढ मागे घेण्याची विनंती केली होती. शरद पवारांच्या या पत्राची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.
मंत्री सदानंद गौडा यांनी शरद पवार यांच्या पत्राची दखल घेऊन त्यांच्याशी वाढलेल्या खतांच्या किंमतीसंदर्भात चर्चा केली. तसेच, पुढील दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासनही दिले होते. त्यानंतर, एकाच दिवसात खतांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी एनसीपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे.
या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी आज पवार साहेबांशी फोनवर चर्चा केली. पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे त्यांनी पवार साहेबांना आश्वासित केले.@PawarSpeaks@DVSadanandGowda#FertilizersPrices
— NCP (@NCPspeaks) May 19, 2021
शरद पवारांनी मांडली शेतकऱ्यांची व्यथा
पेट्रोलच्या किमती शंभर पार असताना केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. त्यामुळे, विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय. आता, खुद्द शरद पवार यांनीही या दरवाढीची दखल घेत केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. तसेच, या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही केली होती.
डीएपी खतावरील सबसिडी वाढवली
केंद्र सरकारने यासंदर्भात डाय अमोनियम फास्फेट (डीएपी) खतावरील सब्सिडी 140 टक्क्यांनी वाढवली असल्याचेही एका निवेदनात म्हणण्यात आले आहे. (Great relief to farmers Narendra Modi government hikes subsidy on DAP fertilizer by 140 per cent) निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खतांच्या किंमतीसंदर्भात एक उच्च स्तरीय बैठक घेतली. यावेळी जागतिक स्तरावर खतांच्या किंमती वाढल्या असल्या तरी, शेतकऱ्यांना जुन्या दरातच खत मिळायला हवे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
सबसिडीत मोठ्या प्रमाणात वाढ
DAP खतासाठी असलेली 500 रुपये प्रति बॅग सब्सिडी वाढवून, आता 1200 रुपये प्रति बॅग करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात DAP च्या किंमती वाढल्या असल्या तरी, ते शेतकऱ्यांना 1200 रुपयांनाच विकण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. तर, वाढलेल्या किमतींचा अतिरिक्त बोजा केंद्र सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गत वर्षी, डीएपीची वास्तविक किंमत 1,700 रुपये प्रति बॅग होती. यात केंद्र सरकार 500 रुपये प्रति बॅग सब्सिडी देत होते. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना 1200 रुपये प्रति बॅग, या दराने खत विकत होत्या. मात्र, आता DAP मध्ये वापरले जाणारे फॉस्फोरिक अॅसिड आणि अमोनिया आदिंच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्थरावर 60 ते 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत.