मुंबई/बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी बीड जिल्ह्यात सभा घेतली. अजित पवार गटात गेलेल्या छगन भुजबळांच्या येवल्यानंतर धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये शरद पवारांनी जाहीर सभेतून भाजपला लक्ष्य केलं. तसेच, कोणाचेही नाव न घेता राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटालाही लक्ष्य केलं. मात्र, या सभेमुळे बीडमधील वातावरण ढवळून निघालं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांनी मैदाना गाजवलं. तर, काही स्थानिक नेत्यांनी शरद पवारांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. त्यामुळे, धनंजय मुंडेंसाठी आता अजित पवारांची सभा बीडमध्ये होत आहे.
बीडमध्ये अजित पवारांची होणारी सभा रद्द करण्यात आल्याचे काही मेसेज व्हाट्सअपवर फिरत होते. मात्र, मंत्री धनंजय मुंडेंनी स्वत: ट्विट करुन ही सभा होत असल्याचं सांगितलंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बीडमधील नेत्यांनी एकप्रकारे शरद पवारांच्या सभेचा धसकाच घेतल्याचं दिसून आलं. येथील सभेत जितेंद्र आव्हाड यांनी मी वंजारी म्हणत... बीडकरांना शरद पवारांसोबत राहण्याचं आवाहन केलं. तर, संदीप क्षीरसागर यांनी सभेचं उत्कृष्ट नियोजन केल्याचं कौतुकही केली. दरम्यान, संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंची नक्कल करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे, आता या टीकेला प्रतिटीका करण्यासाठी अजित पवारांची सभा होणार आहे.
शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथे सभा होत असून धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभेसाठीची बैठकही होणार आहे. विशेष म्हणजे स्वत: धनंजय मुंडेंनी सभा होणारच असे म्हणत माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक २७ ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीचं असल्याचंही मुंडेंनी म्हटलं आहे.
परळीतून १५० बसेस येणार
धनंजय मुंडे यांच्या परळी मतदार संघातून समर्थकांना आणण्यासाठी १५० बसची मागणी परिवहन महामंडळाकडे नोंदविली आहे. कार्यकर्त्यांची वाहने व इतर छोटी वाहने ही वेगळीच असणार आहेत. यासह स्थानिक बीड मतदार संघ आणि बाजूच्या गेवराई मतदार संघातून देखील उपस्थितांची संख्या लक्षणीय असेल असे नियोजन आखण्यात आले आहे. या सभेत काही बडे प्रवेश देखील करण्याचे नियोजन सुरु आहे.