मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या पंधरा दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. मोठ्या प्रमाणावर आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेल्याने आता त्यांच्या मागून नगरसेवक तसेच स्थानिक कार्यकर्ते जाऊ नयेत, यासाठी शिवसेना नेतृत्व मोठा निर्णय घेण्याचा तयारीत आहे. शिवसैनिकांनी शिवसेनेत एकनिष्ठ राहावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधण्याची कल्पना पुढे आणली होती. आता गेल्या काही दिवसांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांनी केलेलं बंड आणि त्यातून झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेनं सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच शिवसेनेतील आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र घेण्याची कल्पना पुढे आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना लिहून द्यावं लागणार आहे.
आदरणीय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास असून, त्यांना आपला बिनशर्त पाठिंबा आहे, असा उल्लेख असलेलं प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांना लिहून द्यावं लागणार आहे. तसेच शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांसाठीही स्वाक्षरी मोहीम राबण्यात येणार आहे.
दरम्यान, शिवसेना नेतृत्वाविरोधात बंडखोरी करत भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काल रात्री हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.