संजय राऊतांनी शिवसेना भवनातून केला वार; किरीट सोमय्या यांनीही केला पलटवार, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 06:50 PM2022-02-15T18:50:10+5:302022-02-15T18:54:43+5:30
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही ट्विटरद्वारे पुन्हा निशाणा साधला आहे.
मुंबई: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. 'तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका'...आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संजय राऊत म्हणाले की, भाजपाचे किरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावा देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सध्या फक्त ट्रेलर आहे, पुढील काळात काही व्हिडीओ समोर आणणार, असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही ट्विटरद्वारे पुन्हा निशाणा साधला आहे. २०१७मध्ये संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशाच प्रकारे माझी पत्नी प्राध्यापिका डॉ. मेधा सोमय्या यांच्यावर इमारत बांधकाम कंपनीच्या संदर्भा आरोप करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला होता, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
सोमय्या पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत? प्रविण राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधांवर का बोलत नाहीत? भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहणार आहे, असं किरीट सोमय्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आत्तापर्यंत ठाकरे सरकारमधील नेत्यांनी माझ्याविरोधात १० गुन्हे दाखल केले आहेत. अजून तीन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे.
I understand his situation
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 15, 2022
I welcome 1 more Case/Investigation We have not done anything wrong. Indulged in any corrupt practices
Why Mr Thackeray & Raut not responding The COVID Centre Scam?
Relationship with Pravin Raut, Sujeet Patkar
Our fight against corruption will go on
माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला-
माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला गेला. त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्या रात्री मी अमित शाहांना कॉल केला होता. मला तुमच्याबद्दल अतिशय आदर आहे. माझ्याशी दुश्मनी आहे, तर मला अटक करा. माझे नातेवाईक, मित्र, निकटवर्तीय त्यांना का टॉर्चर करता?, असा सवाल मी त्यांना विचारला होता, असं राऊतांनी सांगितलं.
मोहित कंबोज फडणवीसांना डुबवणार-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे नाव मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा आसून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपनं १२ हजार कोटींची जागा १०० कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याच माहिती फडणवीसांना माहिती आहे.