Join us  

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान; शिंदे गटानं एकाच वाक्यात खिल्ली उडवली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 4:42 PM

आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिले

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे २ गट पडलेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदार आणि १३ खासदार गेले आहेत. मात्र शिंदे गटावर पहिल्या दिवसापासून आदित्य ठाकरे आक्रमकपणे टीकास्त्र सोडत आहेत. वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्यासाठी आव्हान करत आहेत. त्यात मुंबईच्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी थेट मी राजीनामा देतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, मी वरळीतून राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभे राहावे. निवडून कसे येतात ते मी बघतोच. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी काही ताकद लावायची ती लावा. जेवढे काही खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. त्यांना पाडणारच असं खुलं आव्हान त्यांनी दिले. 

आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिले. शीतल म्हात्रेंनी ट्विट करत म्हटलंय की, गेल्या वेळेला वरळीतून तुम्ही जिंकून येण्यासाठी किती सेटलमेंट केल्यात ते विसरलात का? असा खोचक टोला त्यांनी आमदार आदित्य ठाकरेंना लगावला आहे. वरळी विधानसभा निवडणुकीत मागील वेळी आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच उभे राहिले होते. या मतदारसंघात तत्कालीन विद्यमान आमदार सुनील शिंदे यांना तिकीट न देता आदित्य ठाकरे याठिकाणी उभे राहिले. 

वरळीतील प्रमुख विरोधी नेते सचिन आहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे निवडणुकीत उभे राहणार म्हणून राज ठाकरे यांनीही या मतदारसंघात उमेदवार उभा केला नाही. आदित्य ठाकरे यांचा या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाला. त्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतून सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा सचिन आहिर यांनाही आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून देण्यात आले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या एका वरळी मतदारसंघात सुनील शिंदे, सचिन आहिर आणि स्वत: आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. 

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदे