मुंबई- शिवसेना (Shiv Sena) आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या आघाडीला अखेर मुहूर्त ठरला आहे. आज २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी शिवसेना-वंचीत बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता या आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता वंचित आघाडीही महाविकास आघाडीमध्ये येणार असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांवर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'आमची बोलणी झाली आहे, आम्ही शिवसेनेसोबत युती करणार आहे. आमची युती सेनेबरोबर होत आहे. भविष्यात काय आहे त्याबाबत आता भाष्य करणार नाही. महाविकास आघाडीबाबत आम्ही दोघ बसून ठरवू. मी शिवसेनेच्या शेअरिंग पार्टनरमध्ये आहे की महाविकास आघाडीच्या शेअरिंग पार्टनरमध्ये आहे हे त्यांना ठरवायचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचं खास ट्विट; जुन्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले...
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचितमधील बोलणी झाली आहे. महापालिका निवडणुका तसेच पुढच्या निवडणुकांमध्येही शिवसेना आणि वंचितसोबतच जाणार आहोत. आधी ८३ जागांसाठीची आमची मागणी होती. पण आता शिवसेना जेवढ्या जागा मुंबई महापालिकेसाठी सोडेल त्या मान्य असतील, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
दरम्यान, आजा या आघाडीची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यात काही दिवसातच महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. सर्वपक्षीयांनी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.