मुंबई - शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्हीही गटाकडून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे, शिवसेनेचा दसरा मेळावा असेल किंवा शिवसेनेचा वर्धापन दिन दोन्ही गटांकडून मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं अधिकृत नावही दिलं आहे. तर, उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलंय.
शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष शिवसैनिकांना जेवढा त्रासदायक होता, तितकाच त्रासदायक शिवसेना पक्षासोबत लहानपणापासून जवळीक असलेल्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनाही होता. त्यामुळेच, यापूर्वीच्या एका भाषणात त्यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुरू असलेली लढाई पाहाता मला वेदना होत होत्या, असे म्हटले होते. दोन्ही गटातील राजकीय नेत्यांचं मला घेणंदेणं नाही, पण बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आणि ते धनुष्यबाण चिन्ह जेव्हा तुझं का माझं, माझं का तुझं... असं होत होतं. तेव्हा वेदना व्हायच्या असं राज यांनी म्हटलं होतं. आज शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून ५७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
शिवसेनेच्या दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधला. वर्धापन दिनाचा हा सोहळा आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवरील टीकांनीच गाजला. मुख्यमंत्री शिंदेंनी आपण शाखाप्रमुख पदापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला संघर्ष सांगितला. तर, उद्धव ठाकरेंनी आपणच खरी शिवसेना असून गद्दारांना थारा नसल्याचं म्हटलं. या दोन्ही पक्षप्रमुखांच्या भाषणानंतर मनसेच्या ट्विटर हँडलवरुन राज ठाकरेंचा तोच जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये, राज ठाकरेंनी वेदना होत असल्याचं म्हटलं होतं.
प्रबोधनकारांनी रुजविलेला, स्व. बाळासाहेबांनी बहरवलेला 'शिवसेना' हा विचार आज वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी भरकटवला... ह्याचसाठी स्व. बाळासाहेब आणि त्यांचे सहकारी रक्ताचं पाणी करून झिजले होते का?, असा प्रश्न मनसेनं विचारला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा राज ठाकरेंचा व्हिडिओही शेअर करण्यात आलाय.