भाजपाच्या आमदारांची अन् नेत्यांची चौकशी केली, तर...; अतुल भातखळकर यांचा राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 05:38 PM2022-02-15T17:38:25+5:302022-02-15T17:38:34+5:30
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. 'तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका'...आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, मला पत्रकार परिषदेच्याआधी महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले. 'संजय राऊतजी तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है', असं सर्वजण म्हणाले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा देखील मला फोन आला आणि मला आर्शिवाद दिले, असं संजय राऊतांनी सांगितले.
भाजपाचेकिरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावा देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सध्या फक्त ट्रेलर आहे, पुढील काळात काही व्हिडीओ समोर आणणार, असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर केले आहे. भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अतुल भातखळकर ट्विटरद्वारे म्हणाले की, भाजपा आमदारांची आणि भाजपा नेत्यांची चौकशी केली तर आम्ही तुमच्या सारखे आकांडतांडव करणार नाही. उगाचच हा महाराष्ट्राचा अपमान असा पोरकट बचाव ही करणार नाही. तर्क मांडू, चौकशीला सामोरे जाऊ. कर नाही त्याला डर कशाला?, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
भाजपा आमदारांची आणि भाजपा नेत्यांची चौकशी केली तर आम्ही तुमच्या सारखे आकांडतांडव करणार नाही, उगाचच हा महाराष्ट्राचा अपमान असा पोरकट बचाव ही करणार नाही. तर्क मांडू, चौकशीला सामोरे जाऊ. कर नाही त्याला डर कशाला????
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2022
पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट सोमय्यांवर आरोप-
पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊत म्हणाले.
मोहित कंबोज फडणवीसांना डुबवणार-
देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे नाव मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा आसून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपनं 12 हजार कोटींची जागा 100 कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याच माहिती फडणवीसांना माहिती आहे.