सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाबांचे स्वप्न पूर्ण - मोनिका मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 06:31 AM2020-09-27T06:31:01+5:302020-09-27T06:31:29+5:30
दीड वर्षांपूर्वीच झाले वडिलांचे निधन । हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोनिका मोरेवर हात प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तिला शनिवारी डिस्चार्ज मिळाला. यावेळी ‘खरेखुरे हात लागावेत, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्यांचा दीड वर्षांपूर्वी मृत्यू झाला. आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले,’ असे सांगताना ती भावनाविवश झाली.
प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, २८ आॅगस्ट रोजी तब्बल १६ तास झालेली दोन्ही हातांची यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि त्यांनतर तिच्यात झालेली चांगली सुधारणा, यामुळे मोनिकाला परळच्या ग्लोबल रुग्णालयातून चार आठवड्यांनतर शनिवारी डिस्चार्ज दिला. हात मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण रखडले होते. हातांचे प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या शस्त्रक्रियेनंतर तिला प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात एका स्वतंत्र रूममध्ये ठेवले होते, तसेच तिची काळजी घेण्यासाठी विलगीकरणासह एका नर्सची नियुक्ती देखरेखीसाठी करण्याची आवश्यकता होती. तिच्या दोन्ही हातांना नियमित मलमपट्टी करण्यात आली. हात प्रत्यारोपणाच्या तिसऱ्या दिवशी ती आपल्या खांद्याचा आधार घेऊन चालू व बसू लागली. याशिवाय दिवसातून दोनदा तिला फिजिओथेरपी दिली जात होती. हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी हाताच्या कोपºयापर्यंत प्लास्टर करण्यात आले, असे डॉ. सातभाई म्हणाले. कुर्ला येथे राहणाºया २४ वर्षीय मोनिका मोरे हिला जानेवारी, २०१४ मध्ये घाटकोपर येथे झालेल्या रेल्वे अपघातात दोन्ही हात गमवावे लागले होते. अपघात झाला तेव्हा ती बारावीत होती.
‘लवकरच ती अधिक स्वावलंबी होईल’
येत्या काही आठवड्यांत तिला कोपर हलवायला सांगितले जाईल. हात आणि बोटांनी ३-४ महिन्यांनंतर हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत हाताच्या स्नायूतील टिश्यू, हाड बरे होतील. रुग्णाला या काळात आपल्या दैनंदिन कार्यासाठी मदत घ्यावी लागेल, पण व्यायाम व फिजिओथेरपीद्वारे तसेच हातांची हालचाल नीट होऊ लागली की, लवकरच ती अधिकाअधिक स्वावलंबी होईल. तिच्या हातांच्या रिकव्हरीसाठी साधारण एक ते दीड वर्ष लागेल, असे डॉ. सातभाई यांनी सांगितले.