बोरीवलीच्या भगवती रुग्णालयाला नवनिर्माणाची सहा वर्षांनंतरही प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:52 AM2019-08-04T00:52:38+5:302019-08-04T00:52:48+5:30
पश्चिम उपनगरातील मालाड ते पालघरपर्यंतच्या रुग्णांचा आधार
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड ते पालघर, सफाळापर्यंतच्या रुग्णांचा आधार असलेले बोरीवली पश्चिम येथील पालिकेचे भगवती रुग्णालय गेल्या सहा वर्षांपासून नवनिर्माणाची (सुपर स्पेशालिटी) वाट पाहत आहे. भगवती रुग्णालयाच्या प्रशासनाने २०१३ साली अतिदक्षता विभागातील रुग्णांसहित सर्व कर्मचाऱ्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात स्थलांतरित केले होते. मात्र, ६ वर्षे पूर्ण होऊनही भगवती हॉस्पिटलची एक वीट रचली गेली नाही.
पूर्वी रोज ३ हजार बाह्य रुग्ण येथे येत होते. राजीव गांधी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया होत होत्या. लहान मुलांपासून, अर्भकांपासून, वृद्ध व्यक्तींपर्यंत रुग्णांना सेवा मिळत होती. मात्र, गेल्या ६ वर्षांपासून लाखो रुग्ण उपचारांपासून वंचित आहेत.
जुने भगवती रुग्णालय पाडायच्या आधी नर्सिंग कॉलेजसाठी बाजूला ११ मजल्यांची एक इमारत बांधली होती. मोठ्या थाटामाटात त्याचे उद्घाटन केले होते. त्या नवीन इमारतीत किरकोळ उपचार होतात. फक्त सर्दी, खोकल्यावर, ताप आल्यावरची औषधे वगैरे येथे उपलब्ध आहेत. येथे आॅपरेशन थिएटर नाही. जास्त मोठा आजार असल्यास, अपघात झाल्यास रुग्णाला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. तेथेही योग्य उपचार, मार्गदर्शन नाही. तेथून पुढे केईएममध्ये पाठविले जाते.
नवीन भगवतीमध्ये गेल्या ४ वर्षांपासून सर्व साधनांनीयुक्त मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट तयार होऊन पडले आहे. पण अद्याप ते सुरू झालेले नाही. १५ नर्स, २० चतुर्थ श्रेणी कामगारांची गरज असून, महापालिका प्रशासन कर्मचारी भरायला तयार नाही. त्यामुळे रुग्णांना या सेवेचा काहीच उपयोग नाही. ही सेवा सुरू झाल्यास हृदयरोगी, न्यूमोनिया, छोट्या अपघातातील रुग्णांना मोठा आधार होईल.
‘आरोग्य सेवेचा आढावा घेणार’
भगवती हॉस्पिटलच्या पुनर्निर्मितीसाठी ५ वेळा निविदा मागवून पुन्हा रद्द केल्या गेल्या. कुणाचा आर्थिक फायदा व्हावा म्हणून प्रशासन अजून वाट पाहात आहे? या बेदरकार वृत्तीचा मुंबई प्रदेश काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी निषेध केला आहे. अभिनेत्री व काँग्रेसच्या नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांच्या माध्यमातून लवकरच महापालिकेच्या संपूर्ण आरोग्य सेवेचाच आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.