७२ दिवस मुंबई विमानतळावर काढल्यानंतर घानाच्या फुटबॉल पटूची हॉटेलमध्ये रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:31 PM2020-06-06T18:31:30+5:302020-06-06T18:31:56+5:30
केरळमधील स्पोर्टस क्लबमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी आलेल्या व लॉकडाऊनमुळे मुंबई विमानतळावर अडकलेल्या घानाच्या फुटबॉलपटू रँन्डी ज्युअँन मुल्लर याची तब्बल 72 दिवसानंतर विमानतळावरुन सुटका झाली व हॉटेलमध्ये रवानगी झाली.
मुंबई : केरळमधील स्पोर्टस क्लबमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी आलेल्या व लॉकडाऊनमुळे मुंबई विमानतळावर अडकलेल्या घानाच्या फुटबॉलपटू रँन्डी ज्युअँन मुल्लर याची तब्बल 72 दिवसानंतर विमानतळावरुन सुटका झाली व हॉटेलमध्ये रवानगी झाली. या कालावधीत मुंबई विमानतळ हे त्याचे जणू घर बनले होते. विमानतळावरील कर्मचारी व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या जवानांनी त्याच्या खाण्यापिण्याची या कालावधीत काळजी घेतली. या फुटबॉलपटूकडील सर्व पैसे संपल्यानंतर त्याने राज्याचे मुख्य मंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे सोशल मीडिया वरुन मदतीची याचना केली व त्यानंतर त्याला विमानतळावरुन हॉटेलमध्ये हलवण्यात आले.
मुल्लरने सोशल मीडिया वरुन मदतीची याचना केल्यानंतर मुख्य मंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने युवासेनेचे राहुल कनाल यांनी त्याला विमानतळावरुन वांद्रे येथील हॉटेलमध्ये नेले. त्याला घानामध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती कनाल यांनी दिली. केरळातील स्पोर्टस क्लबमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी मुल्लर सहा महिन्याच्या व्हिसावर भारतात आला होता. भारतात येण्यासाठी त्याने दीड लाख रुपये खर्च केला होता. मात्र त्याला प्रत्येक सामन्यामध्ये अवघे तीन हजार रुपये मिळत होते. देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडू लागल्याने त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला मुंबईत पोचण्यास विलंब झाल्याने त्याला जाता आले नाही. त्याने मुंबई विमानतळावर थांबण्याचा निर्णय घेतला.
21 मार्च पासून तो विमानतळावर वास्तव्य करत होता. त्याच्याकडील पैसे संपल्याने विमानतळावरील कर्मचारी व सीआयएसएफचे जवान त्याला खाण्याचे पदार्थ व काही पैेसे देत होते. जवान व कर्मचाऱ्यांकडून त्याला अनेकदा समोसा व चायनीज राईस दिले जात होते. विमानतळावरील काही प्रवासी त्याला पैसे, अन्न व पुस्तके देखील देत होते. त्याचा फोन खराब झाल्यानंतर त्याला जवानांनी दुसरा फोन देखील मिळवून दिला त्यामुळे त्याला घानामधील त्याच्या नातेवाईकांशी व मित्रांसोबच संपर्क साधणे शक्य होत होते. मुल्लर ने मुख्य मंत्री, आदित्य ठाकरे व राहुल कनाल यांचे सोशल मीडिया द्वारे आभार व्यक्त केले आहेत.