Join us

आश्चर्य! अकरा वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर 'ते' दोघे ठरले निर्दोष!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 6:15 AM

सुप्रीम कोर्टाचा निकाल : तब्बल १७ वर्षांनी खुनाचा कलंक दूर

मुंबई : कल्याण येथील उमेश पडवळ आणि प्रवीण गोडसे या शेजाऱ्यांनी प्रत्यक्षात न केलेल्या खुनाबद्दल तब्बल ११ वर्षे सात महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सर्व आरोपांतून पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे. प्रथम अटक झाली तेव्हा उमेश २० तर प्रवीण १८ वर्षांचा होता.

उमेश व जगन्नाथ हे काळा तलाव येथील शिव मंदिराच्या मागील काटकर चाळीत राहायचे. नाशिक जिल्ह्याच्या पेढ तालुक्यातील कायरे सदरपाडा येथील झानेश्वर मानभाव या बेरोजगार तरुणाचे अपहरण करून खून केल्याच्या खटल्यात कल्याण येथील सत्र न्यायालयाने या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. नंतर उच्च न्यायालयानेही ती शिक्षा कायम केली होती. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील मंजूर करून न्या. एन. व्ही. रमणा, न्या. मोहन शांतनागोदूर व न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने या दोघांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

जुलै २००२ मध्ये अटक झाल्यापासून तब्बल ११ वर्षे सात महिने तुरुंगात राहिल्यानंतर आॅगस्ट २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली होती. अशा प्रकारे संपूर्ण तारुण्य ‘खुनी’ म्हणून नासविल्यानंतर न्यायसंस्थेने उमेशला आता वयाच्या ३८ व्या व जगन्नाथला ३५ व्या वर्षी मोकळे सोडले आहे! हा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. संपूर्ण साक्षीपुराव्यांचा साकल्याने विचार करता अपहरण आणि खून हे गुन्हे याच आरोपींनी केले असा नि:संदिग्ध निषेर्ष काढण्याएवढी पुराव्यांची साखळी जुळत नाही. तसेच मुरबाडजवळच्या गोरक्षगडाच्या दरीत एका झाडावर दुर्गम ठिकाणी अडकलेले ज्ञानेश्वरचे प्रेत उमेशने दाखविल्याचे खोटे पुरावेही बाजारपेठ पोलिसांनी तयार केले, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.काय होते हे प्रकरण?विवाहित पण बेरोजगार असलेल्या ज्ञानेश्वर प्लंबर होता.त्याचे मामा जयराम धूम कल्याममध्ये काळा तलाव परिसरात राहायचे.वाशिंदच्या जंदाल कारखान्यात नोकरी लावून देतो असे कळल्याने जयराम उमेशला भेटले. त्याने त्यासाठी ६० हजार रुपये लागतील, असे सांगितले. जयराम यांनी तसे ज्ञानेश्वरला कळविले. तो तेवढ्या पैशाची तजवीज करून गावाहून आला. एका ऊसाच्या रसाच्या गुºहाळात उमेशला पैसे दिले गेले. यानंतर उमेश ज्ञानेश्वरला वाशिंदला कंपनीत गेऊन जातो, असे सांगून सोबत घेऊन गेला.त्या दिवशी रात्री ज्ञानेश्वर घरी आला नाही म्हणून जयराम यांनी उमेशकडे चौकशी केली. कंपनीतून परत येताना वाशिंद रेल्वे स्टेशनवर ज्ञानेश्वर न सांगता कुठेतरी गेला, असे उमेशने त्यांना सांगितले. यातून सुरुवातील ज्ञानेश्वर बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविली गेली व नंतर उमेश व जगन्नाथ यांच्यावर फसवणूक, अपहरण व खुनाचा खटला दाखल झाला.

टॅग्स :सर्वोच्च न्यायालयगुन्हेगारीमुंबईन्यायालयखून