मुंबई : मुंबईतील विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी यासंदर्भात महाविद्यालयीन प्रशासन, पोलीस, मुंबई विद्यापीठ कुलगुरू तसेच रुग्णालय प्रशासन यांची भेट घेतली आहे. कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडला असून यासाठी दोषी आयोजक आणि प्रशासन यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.मिठीबाई महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक कार्यक्रम घेतले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कॉलेजमध्ये कलोझियम हा मॅनेजमेंट फेस्टिव्हल सुरू होता. ज्यात गुरुवारी रात्री एक गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला डिवाईन रॅपरला बोलावण्यात आले असून आपण फरफॉर्म करणार आहोत, अशी पब्लिसिटी त्याने केली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची गर्दी वाढली; परंतु ते विद्यार्थी नव्हते. यामुळे गेटवर गर्दी झाल्याने सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. या वेळी झालेल्या गोंधळात काही विद्यार्थ्यांना इजा झाल्याची माहिती मिठीबाईचे प्राचार्य राजपाल हांडे यांनी दिली. जेथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याची क्षमता ४ हजार आहे आणि पासेस ४५०० छापले गेले होते. नेहमी जेवढे पासेस जातात त्यापैकी ६० ते ७० टक्केच विद्यार्थी येतात. त्यातही १५०० पासेस बाकी राहिले म्हणजे ३ हजार पासेसच वाटले गेले असल्याचे महाविद्यालयीन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, विद्यार्थी संघटनांनी हे प्रकरण लावून धरले असून महाविद्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी मिठीबाई प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी मनविसेकडून करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे आणि मुंबई अध्यक्ष संतोष धोत्रे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. सोबतच महाविद्यालयाला अनुदान आयोगाने नुकताच दिलेला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा रद्द करण्याविषयी मानव संसाधन विभागाकडे पत्रव्यवहार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.महाविद्यालयाकडून असे कार्यक्रम आयोजित केले जात असताना सगळ्या आवश्यक परवानगींची पूर्तता केली जाते का, असा सवाल सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी या महाविद्यालयाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.विद्यार्थ्यांवर उपचार सुरूचमुंबईतील विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयातील कार्यक्रमात गोंधळ, चेंगराचेंगरी झाल्याने आठ विद्यार्थी जखमी झाले. यातील पाच विद्यार्थ्यांवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर तीन विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिठीबाई महाविद्यालयीन प्रशासनाने दिली आहे.
मिठीबाईतील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर विद्यार्थी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 4:02 AM