Join us  

Gautam Adani: 'FPO रद्द केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले असेल, पण...'; गौतम अदानींनी Video केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 8:49 AM

Gautam Adani: FPO रद्द केल्याचा निर्णय घेतल्यानंतर अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्हिडिओ शेअर करत आपले मत मांडले आहे.

मुंबई: अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समुहानं काढलेला FPO रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटमधील चढ-उतार पाहता कंपनीच्या संचालक मंडळाने FPO रद्द केला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपले मत स्पष्ट केले आहे. 

पूर्ण सदस्यता घेतलेल्या FPO रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण आज बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, FPO बरोबर पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही असे बोर्डाला ठामपणे वाटले, असं गौतम अदानींनी सांगितले. माझ्यासाठी, माझ्या गुंतवणूकदारांचे हित सर्वप्रथम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना संभाव्य तोट्यापासून वाचवण्यासाठी आम्ही FPO मागे घेतला आहे. या निर्णयाचा आमच्या विद्यमान कार्यांवर आणि भविष्यातील योजनांवर परिणाम होणार नाही. आम्ही वेळेवर अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करु, असं गौतम अदानी यांनी स्पष्ट केले.

आम्ही FPO तून मिळालेली रक्कम परत करणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित व्यवहार समाप्त करणार आहोत. बाजार स्थिर झाल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचे पुनरावलोकन करू. आम्ही ईएसजीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे आणि आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदारीने मूल्य निर्माण करत राहील, अशी माहिती गौतम अदानी यांनी दिली. 

दरम्यान, अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने कथित गैरव्यवहारांबाबत अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाला दिलेल्या दोन लाख कोटींपेक्षा अधिक कर्जाचा बँकांनी आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. हिंडेनबर्ग अहवालामुळे शेअर मार्केटमधील अदानी समूहाचे शेअर सपाटून पडले. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. 

अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २८.४५ टक्क्यांनी घसरला आणि ८४६.३० रुपयांच्या तोट्यासह २१२८.७० रुपयांवर बंद झाला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप ९६,४७८.२९ कोटी रुपयांनी कमी झाले. कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसापूर्वी ३,३९,१५०.३३ कोटी रुपये होते, ते आज २,४२,६७२.०४ कोटी रुपयांवर आले आहे. 

काय असतो FPO?

FPO फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे कुठल्याही कंपनीसाठी पैसे जमा करण्याची एक पद्धत आहे. जी कंपनी पहिल्यापासून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असते ती गुंतवणूकदारांना नवे शेअर ऑफर करते. हे शेअर बाजारातील उपलब्ध असणाऱ्या शेअर्सपेक्षा वेगळे असतात. 

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार