लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - गोरेगाव येथील वीर बाजीप्रभू ढोल ताशा पथकाच्या बसला एप्रिल महिन्यात मुंबई पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात पथकातील १५ वादकांनी आपला जीव गमावला, तर एकूण २७ जण जखमी होते. या अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येकाचीच पथकाला वेगळ्या उंचीवर पाहण्याची इच्छा होती, त्यामुळे आपल्या मित्र - मैत्रिणींचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ढोल ताशा पथकाने साथ सोडलेल्या वादकांच्या स्मरणात नव्या दमात, नव्या ढंगात पुन्हा एकदा आपल्या वादनाचा ' श्रीगणेशा' केला आहे.
यापूर्वी , या पथकाचे नाव ' वीर बाजीप्रभू ढोल ताशा पथक ' असे होते. आता नव्या पथकाचे नाव ' फत्तेशिकस्त - वाद्यपथक ' असे असून यात जुन्या वादकांसह नवी मंडळीही सहभागी होत आहे. पथकाचे प्रमुख आराध्य जाधव, रोशन शेलार, ओम कदम आणि कार्तिक बारोट यांनी हा विडा उचलला असून या माध्यमातून ढोल ताशा पथकाला जागतिक किर्ती मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीच्या निमित्ताने मंगळवारी गोरेगाव येथील मीनाताई ठाकरे मैदानात नव्या पथकाची घोषणा करण्यात आली.
मुंबईतील गोरेगाव येथील या पथकाला कायमच राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठी मागणी असते. गणेशोत्सव, नवरात्र असो किंवा शिवजयंती, फुले जयंती, आंबेडकर जयंती - सण उत्सव, गावगोवाच्या जत्रा अशा असंख्य कार्यक्रमांसाठी त्यांच्या पथकाला चांगली मागणी होती. या पथकातील तरुण तरुणींना या निमित्ताने मिळणाऱ्या पैशांमधून त्यांचा शाळा, कॉलेजचा खर्चही निघत असल्याने पथकात सहभागी होण्यास वादक कायमच उत्सुक असतात, असे पथक प्रमुख सांगतात.
मित्र - मैत्रिणींना समर्पित - आराध्य जाधव, पथक प्रमुख
आमचे पथक हे कुटुंबाप्रमाणे होते, त्यात बहिण, भाऊ, मित्र- मैत्रिणी यांचे नाते घट्ट होते. मात्र अपघातानंतर सर्वांच्याच मनात एक हळवा कोपरा आणि अनामिक भीती निर्माण झाली. तरीही कायमच साथ गमावलेल्या मित्र- मैत्रिणींचे पथकाला मोठे करण्याचे स्वप्न, त्यासाठी लागणारी मेहनत कायमच आठवत राहायची. त्यामुळे त्यांना समर्पण म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी करावे या हेतूने त्यांच्या कुटुंबियांसमोर हा विषय मांडला. पथक पुन्हा सुरु करणार या विचाराने त्यांच्या पालकांनीही प्रोत्साहन दिले. त्यामुळे पालकांच्या आशिर्वादाने आणि मित्र मैत्रिणींसाठी आमच्या वादनाने मंत्रमुग्ध करायला पथक पुन्हा सज्ज झाले आहे.
त्यांनीच दिले पुन्हा उभं राहण्याचं बळ - कार्तिक बारोट, पथक प्रमुख
एप्रिलमध्ये झालेला अपघात आमच्या आयुष्यावर आघात करुन गेला. मात्र या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी साथ सोडलेल्या मित्र - मैत्रिणींच्या शब्दांनीच बळ दिल्याची भावना मनात आहे. पथकाचा सराव असताना कायमच वादनाकडे केवळ काही तासाचे वादन असे न पाहता, त्या पलीकडे ही कलेला वेगळे वलय मिळावे. यासाठी प्रत्येक जण मेहनत घ्यायचा, मात्र जुन्या वादकांच्या सोबतीने ही इच्छा पूर्ण झाली नाही. पण म्हणून त्यांच्याच शब्दांतून प्रेरणा घेऊन हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल हा विश्वास आहे.