लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काही भागांतील रस्त्यांची कामे रखडल्यामुळे पाच कंत्राटदारांना मुंबई महापालिकेने दंड ठोठावला आहे, तर एका कंत्राटदारासोबतचे कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावण्याची कारवाई केल्यानंतर पालिकेने आता रस्त्यांच्या कामाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळालेल्या रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे १६७ रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी मुंबईतील सर्वच रस्ते सिमेंटचे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन लगोलग कामाला लागले होते. मुंबईतील ३९७ किमीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातही महत्त्वाची बाब म्हणजे शहर भागातील रस्त्यांची कामे कार्यादेश मिळूनही कंत्राटदाराने सुरू केली नव्हती. जानेवारी २०२३ मध्ये संबंधित कंत्राटदाराला कार्यादेश मिळाला होता. या कंत्राटदाराव्यतिरिक्त रस्त्यांची कामे रखडवणाऱ्या तीन कंत्राटदारांना पालिकेने दंड ठोठावला होता. तरीही शहर भागातील कामे ठप्पच होती.
माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाने त्यांची दखल घेतल्याचे दिसले नाही. पावसाळा संपल्यानंतरही कामे सुरू झाली नव्हती.
भाजपचे दक्षिण मुंबईतील नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी या प्रकाराबाबत पालिकेकडे तक्रार केल्यानंतर मात्र सूत्रे हलली.संबंधित रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंत्राटदाराला पालिकेने करार रद्द करण्याची नोटीस पाठविली. तसेच स्पष्टीकरण देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली.
काळ्या यादीचा होता इशारास्पष्टीकरणाने समाधान न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही प्रशासनाने दिला होता. रस्त्यांची कामे रखडल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयानेही दखल घेतली होती.
आता मात्र रस्त्यांच्या कामाला गती देण्यावर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. १६७ रस्त्यांची कामे करण्यास वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे. जसजशी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळेल त्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू होतील.
शहर भागातील ७२ किमी, पूर्व उपनगरातील ७१ किमी आणि पश्चिम उपनगरातील २५४ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अनुक्रमे १,२३३ कोटी, ८४६ कोटी आणि ४,००० कोटी, असे मिळून ६,०७९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानंतर काही भागांत कामाला सुरुवातही झाली. मात्र, पावसाळ्यात ही कामे ठप्प पडली होती.